बंगळुरु : कर्नाटकमध्ये पहिल्या चार तासांत चोवीस टक्के मतदानाची नोंद झालीय. सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरु रहाणार आहे. कर्नाटकमध्ये विधान सभेच्या एकूण 222 जागांसाठी मतदान होतंय. 4 कोटी 96लाख मतदार या निवडणकुीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. हे मतदान ईव्हीएम मशीनवर होतंय.
या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. त्यामुळे मतदारराजा कुणाला कौल देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 15 मे रोजी या कर्नाटकच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान बंगळुरुमधील राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
इथल्या जलाहल्लीतील एका फ्लॅटमध्ये गेल्या मंगळवारी 10 हजार बानवट निवडणूक ओळखपत्र जप्त करण्यात आली. त्यामुळे निवडणूक आयोगानं इथलं मतदान पुढे ढकललंय. 12 मे ऐवजी 28 मे रोजी इथं मतदान होणार आहे.. तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. तसंच जयनगर विधानसभा मतदारसंघतील भाजपाचे उमेदवार विद्यमान आमदार विजय कुमार यांचा मृत्यू झाल्यान इथली निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आलीय.