Karnataka Court Murder : कर्नाटकातील (Karnataka) कौटुंबिक न्यायालयात एका व्यक्तीने चाकूने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर समुपदेशन सत्रात सहभागी होण्यासाठी दोघेही येथे आले होते. गुन्हा केल्यानंतर पतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडले.
समुपदेशन संपल्यानंतर पतीने चाकूने गळा चिरून पत्नीची हत्या केली. त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी पतीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
समुपदेशन सत्रादरम्यान दोघांनीही आपापसातील मतभेद विसरून पाच वर्षांचे वैवाहिक जीवन विस्कळीत होण्यापासून वाचवण्याचे मान्य केले होते.
जिल्हा पोलिस अधीक्षक हरिराम शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चित्रा हिचा विवाह पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्याचवेळी होलेनरसीपूर शहरातील रहिवासी असलेला शिवकुमार पत्नीपासून घटस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी जिल्हा न्यायालयात गेला होता. त्याला दोन मुलेही होती.
आरोपी शिवकुमारचे पत्नीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून भांडण होत होते. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने दोन वर्षांपूर्वी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
दरम्यान, तासाभराच्या समुपदेशनानंतर पत्नी बाहेर येताच शिवकुमार तिच्या मागे बाथरुमपर्यंत गेला. ती एकटी असल्याचे पाहून त्याने चाकूने तिचा गळा चिरला आणि तिला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी शिवकुमारला अटक करत त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तो चाकू घेऊन न्यायालयात कसा घुसला याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. आरोपींनी ज्या शस्त्राने गुन्हा केला आहे ते शस्त्र जप्त करण्यात आले आहे.
चौकशीनंतर या प्रकरणाशी संबंधित इतर खुलासे केले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चाकूने हल्ला झाल्याने घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.