Prajwal Revanna Arrested By All Female Police Team: लैंगिक शोषण आणि सेक्स स्कँडल प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या जेडीएसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यात आली आहे. हासन मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभा राहिलेला प्रज्वल रेवण्णा आज पहाटे भारतात परतला. मागील 35 दिवसांपासून तो जर्मनीत होता. बंगळुरु विमानतळावर पोहोचल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्याला विशेष तपास समितीने अटक केली. प्रज्वल 27 एप्रिल रोजी देश सोडून पळून गेला होता. विशेष म्हणजे प्रज्वल रेवण्णाला आज विमानतळावर अटक करणाऱ्या टीममध्ये सर्व महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता.
बंगळुरु विमानतळावर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी महिला पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. एसआयटीच्या या विशेष पथकामध्ये सर्व महिला अधिकारी असून त्या प्रज्वल रेवण्णाला सीआयडीच्या कार्यालयात घेऊन गेल्या.
प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यासाठी महिला पथक पाठवून या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रज्वल रेवण्णाने खासदार म्हणून आपल्या पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करत महिलांबरोबर जे काही केलं त्यासाठी त्याच्याविरोधात महिलांचीच टीम कारवाई करणार असून महिलांनाच त्याचा अटक करण्याचा अधिकार असल्याचं यामधून सूचित करायचं होतं. तसेच प्रज्वल रेवण्णाने छळ केलेल्या माहिलांनाही संदेश देण्यात आला असून महिला कोणालाही घाबरत नाहीत, असं यातून सांगायचा प्रयत्न करण्यात आला. प्रज्वल रेवण्णाला सीआयडीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेलेल्या जीपमध्ये त्याच्याबरोबर पाच महिला अधिकारी होत्या.
प्रज्वल रेवण्णालाची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्याला सरकारी रुग्णालयामध्ये नेलं जाईल. त्यानंतर अटकेच्या 24 तासाच्या आत त्याला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करावं लागणार आहे. पोलीस प्रज्वल रेवण्णालाच्या कस्टडीची मागणी करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रज्वल रेवण्णाची 14 दिवसांची कोठडी मागीतली जाईल. मात्र कोर्टाकडून 7 ते 10 दिवसांची पोलीस कोठडी देऊ शकते.
फॉरेन्सिक टीम प्रज्वल रेवण्णाच्या ऑडिओ सॅम्पलही कलेक्ट करणार आहे. व्हायरल सेक्स व्हिडीओंमध्ये येणारा आवाज प्रज्वल रेवण्णाचाच आहे का हे तपासून पाहण्यासाठी या सॅम्पलाचा फायदा होणार आहे. प्रज्वल रेवण्णाविरोधात आतापर्यंत 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याच आठवड्यांमध्ये कर्नाटकमधील हसन मतदारसंघातून खासदार असलेल्या प्रज्वल रेवण्णाने एक व्हिडीओ जारी केला होता. ज्यामध्ये त्याने 31 मे रोजी आपण एसआयटीसमोर हजर राहू असं सांगितलं होतं. आपण तपासामध्ये सहकार्य करु असं सांगितलं होतं. कर्नाटकमध्ये लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी आणि व्हिडीओ समोर आले होते. त्यानंतर प्रज्वल रेवण्णाने देश सोडून पळ काढला होता. एसआयटीच्या मागणीनुसार इंटरपोलने 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी केली होती.