Amritpal Singh Surrender: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमृतपाल सिंग सतत पोलिसांना चकमा देत असून वेगवेगळ्या वेशभूषेत सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग पुन्हा पंजाबमध्ये परतला असून सुवर्ण मंदिरात आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे.
'वारिस पंजाब दे'चा प्रमुख अमृतपाल सिंग होशियापूर येथून अमृतसरच्या दिशेने प्रवास करत असताना पंजाब पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती. पण रात्री उशिरा चेकपोस्टच्या माध्यमातून तो पुन्हा एकदा फरार होण्यात यशस्वी ठरला. गेल्या 10 दिवसांपासून फरार असणारा अमृतपाल सिंग लवकरच आत्मसमर्पण करण्याची शक्यता असल्याने अमृतसर सध्या हाय-अलर्टवर आहे. पोलिसांचा मोठा फौजफाट सुवर्णमंदिराच्या भोवती तैनात करण्यात आला आहे.
पंजाब पोलिसांना अमृतपाल सिंग आणि त्याचे सहकारी होशियारपूरमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी होशियारपूरमधील गाव आणि जवळच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. पोलिसांनी जेव्हा त्यांच्या ठिकाणांची माहिती मिळाली तेव्हा अमृतपाल सिंग आणि त्याचे सहकारी गुरुद्वाराजवळ आपली वाहनं सोडून फरार झाले. यानंतर त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करत सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. पोलिसांनी चेकपोस्ट आणि बॅरिकेड्स उभारलेले असतानाही अमृतपाल सिंग पुन्हा एकदा फरार होण्यात यशस्वी झाला.
18 मार्चपासून पोलीस अमृतपाल सिंग आणि त्याची संघटना 'वारिस पंजाब दे'च्या सदस्यांचा शोध घेत आहे. पण अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाही. तीन आठवड्यांपूर्वी अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांनी आपल्या सहकाऱ्याची सुटका करण्यासाठी पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. तेव्हापासून पोलीस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
18 मार्चला वाहनांची अदलाबदली करत अमृतपालने पोलिसांना चकमा दिला होता. तसंच त्याने वारंवार वेषभूषेतही बदल केला होता. हरियाणा आणि दिल्लीमधील अनेक सीसीटीव्हीत तो कैद झाला होता.
नुकत्याच समोर आलेल्या फुटेजमध्ये अमृतपाल सिंग आणि त्याचा सहकारी पपलप्रीत सिंग दिल्लीच्या रस्त्यांवर चालताना दिसत आहेत. दोघांनी चष्मा आणि मास्क घातल्याचंही त्यात दिसत आहे. पंजाब पोलिसांनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगने पोलिसांसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. त्यानुसार कोठीडत मारहाण केली जाऊ नये, पंजाबमधील जेलमध्ये ठेवलं जावं आणि अटक न दाखवता आत्मसमर्ण दाखवावं अशा त्याच्या मागण्या आहेत.