नवी दिल्ली: मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षण आणि आरोग्य यासारख्या महत्त्वपूर्ण सामाजिक घटकांकडे दुर्लक्ष झाल्याचे मत प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी मांडले. अमर्त्य सेन यांच्या 'भारत और उसके विरोधाभास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवारी पडला. यावेळी त्यांनी म्हटले की, बऱ्याच गोष्टी चुकीच्या वळणावर गेल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या काळात शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेशी तजवीज झाली होती, असे नव्हे. मात्र, २०१४ पासून ही दोन क्षेत्रे कमालीच्या वेगाने चुकीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सेन यांनी सांगितले.
एकीकडे भारतीय अर्थव्यवस्था जोमाने वाढत असताना दुसरीकडे मात्र भारताची पिछेहाट का होत आहे, या विसंगतीवरही त्यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, २० वर्षांपूर्वी शिक्षण व आरोग्याच्याबाबतीत भवतालच्या परिसरातील सहा देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागत असे. त्यावेळी चांगल्या शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा पुरवण्यात श्रीलंका पहिल्या स्थानावर होती. मात्र, आताची परिस्थिती पाहिल्यास भारत शेवटहून दुसरा आहे. पाकिस्तानातील अंतर्गत कलहांमुळे भारताने रसातळाला जाण्यापासून स्वत:ला कसेबसे वाचवले आहे. भारताकडे असलेल्या चांगल्या गोष्टींचा लोकांना अभिमान वाटायला हवा, हे खरे आहे. मात्र, देशासाठी लज्जास्पद ठरणाऱ्या गोष्टींचाही त्यांनी विचार केला पाहिजे, असे अमर्त्य सेन यांनी सांगितले.
यावेळी अमर्त्य सेन यांनी वीएस नायपाल यांच्या 'ए हाऊस फॉर मिस्टर बिश्वास' या पुस्तकाचाही दाखला दिला. त्यांनी म्हटले की, या पुस्तकात १३ व्या शतकानंतर नष्ट करण्यात आलेल्या भारतीय संस्कृती आणि मंदिरांचा उल्लेख आहे. मात्र, इतके चांगले पुस्तक लिहणाऱ्या लेखकाचे मनपरिवर्तन करता येत असेल तर कोणाचेही मत बदलता येऊ शकते, असे अमर्त्य सेन यांनी सांगितले.