मणिपूरमध्ये 15 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय

Updated: Jun 28, 2020, 09:59 PM IST
मणिपूरमध्ये 15 जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा title=

इंफाळ :​ कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मणिपूर सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी याची घोषणा केली. त्यांनी राज्यात 1 ते 15 जुलै दरम्यान लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये कोरोनाचे 1092 रुग्ण आहेत. ज्यामध्ये 660 रुग्ण हे उपचार घेत आहेत तक 432 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मणिपूरच्या व्यतिरिक्त याआधी झारखंड आणि पश्चिम बंगालने देखील लॉकडाउन वाढवला होता. झारखंडमध्ये लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी म्हटलं की, 'कोरोनाचा सामना करताना जनतेच्या सहयोगाने राज्य सरकारला अपेक्षित यश मिळालं आहे. पण संघर्ष सुरु आहे. सध्याची परिस्थितीचं गंभीरतेने विचार करत राज्य सरकारने लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.'

पश्चिम बंगालमध्ये देखील 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. शाळा आणि महाविद्यालयं देखील 31 जुलैपर्यंत बंद असणार आहेत.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील 24 तासात 19,906 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर 410 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 5,28,859 वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत 16,095 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3,09,713 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.