ओपनएआयसाठी काम करणारा आणि नंतर कंपनीविरुद्ध व्हिसलब्लोअर बनलेला भारतीय-अमेरिकन AI संशोधक सुचिर बालाजी, त्याच्या सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. 26 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेला आता आत्महत्या असल्याच म्हटल जात आहे. चार वर्षे ओपन एआयसाठी उत्तम काम करणारा आणि चॅट जीपीटीच्या विकासात मोठी भूमिका बजावणारा बालाजी ओपन एआयवर अनेक आरोप केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
सुचीर म्हणाला की, चॅटजीपीटी तयार करण्यासाठी पत्रकार, लेखक, प्रोग्रामर इत्यादींचे कॉपीराइट केलेले साहित्य परवानगीशिवाय वापरले गेले आहे, ज्याचा थेट परिणाम अनेक व्यवसाय आणि व्यापारांवर होईल. त्याचे ज्ञान आणि साक्ष यांचा ओपनएआय विरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर खटल्यांवर मोठा परिणाम होऊ शकतो. या सगळ्या दरम्यान सुचीर मृतावस्थेत सापडला.
वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या सुचीरचा हा फोटो त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवरून घेतला आहे. बालाजीने केवळ एआयमध्ये योगदान दिले नाही तर या कंपनीतील चुकीच्या पद्धती आणि कृतींविरुद्ध जोरदार आवाज उठवला. ओपनएआय विरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर प्रकरणांमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावेल असे मानले जात होते.
एकेकाळी एआयसाठी काम करणाऱ्या बालाजीने असा दावा केला होता की, ओपनएआयच्या कामाच्या पद्धती धोकादायक आहेत. कारण त्यांनी एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी परवानगीशिवाय कॉपीराइट केलेले साहित्य वापरले होते. बालाजी याने वारंवार एआयच्या नैतिक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, जे त्याच्या मते इंटरनेटच्या संपूर्ण परिसंस्थेला हानी पोहोचवू शकते.
न्यू यॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बालाजी म्हणाला होता की, ओपनएआयचे व्यवसाय मॉडेल अस्थिर आहे आणि इंटरनेट इकोसिस्टमसाठी अत्यंत हानिकारक आहे. ज्यांना कंपनी सोडणे योग्य वाटत होते त्यांना त्याने औपचारिक आवाहन केले.
सुचिर बालाजी याने बालपण कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथे घालवले आणि नंतर यूसी बर्कले येथे संगणक शास्त्राचे शिक्षण घेतले. कॉलेजमध्ये असताना त्याची एआयमध्ये आवड वाढली आणि त्याने रोग बरे करणे आणि वृद्धत्व रोखणे यासारख्या विषयांवर एआयशी संबंधित संशोधन करण्यास सुरुवात केली.
ओपनएआयमध्ये असताना, बालाजीने चॅटजीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जाणारा इंटरनेट डेटा गोळा करण्यात आणि त्याचे आयोजन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या कामामुळे लोकप्रिय एआय मॉडेल्सना आकार देण्यात मोठी मदत झाली.
This doesn’t seem like a suicide
— Elon Musk (@elonmusk) December 29, 2024
या सगळ्या प्रकरणावर आई पूर्णिमा रामारावने एफबीआयकडून तपासाची मागणी केली आहे. त्यांच्या मुलाच्या राहत्या घराची तोडफोड केली होती. एवढंच नव्हे तर बाथरुममध्ये रक्ताचे डाग दिसत होते. या सगळ्या गोष्टी आत्महत्या नाही तर हत्येची शंका निर्माण करत होते.
सुचिरच्या आईचं असं म्हणणं आहे की. त्यांच्या मुलाच्या हत्येला आत्महत्या घोषित केलं आहे. अधिकाऱ्यांनी योग्य ती तपासणी केली नाही. एवढंच नव्हे तर एलॉन मस्क यांनी देखील ही आत्महत्या वाटत नसल्याच म्हटलं आहे. मस्कने सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली.