नवी दिल्ली : lok sabha election 2019 लोकसभेच्या ५४२ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या सत्रात भाजप आणि मित्रपक्षांना आघाडी दाखवण्यात येत आहे. हे पाहता देशात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येण्याचं चित्र आणखी ठळक झालं आहे. याच धर्तीवर दिल्लीत भाजपाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि कलाविश्वाकडून राजकारणाकडे वळलेल्या मनोज तिवारी यांनी भाजपाच पुन्हा एकदा ३५० हून जास्त जागांवर निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
'मागच्या निवडणुकांमध्ये देश एका आशेच्या किरणाच्या शोधात होता, ज्या आधारे ३०० जागांवर भाजपाला निवडून देण्यात आलं. पण, यावेळी मात्र प्रश्न हा जनतेच्या विश्वासाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेला विश्वास आहे, सोबतच त्यांच्या कामगिरीने जनता प्रभावितही आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, जवळपास ३५० हून अधिक जागांवर भाजपाला यश मिळेल', असं तिवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना स्पष्ट केलं.
लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या तिवारी यांच्या मतदार संघाकडेही देशातील लक्षवेधी मतदार संघांपैकी एक म्हणून पाहिलं जातं. उत्तर पूर्व दिल्लीच्या या मतदार संघात भाजपाच्या मनोज तिवारी, काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि आपचे दिलीप पांडे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.
भाजपाच्या विजयाविषयी विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि नेते वाईट नाहीत, हा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. काँग्रेसमधील बऱ्याचजणांना त्यांच्या पक्षाकडून भुतकाळात झालेल्या चुकांची जाणिव आहे. परिणांमी त्यांनी आता परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार रहावं, असं सूचक विधान तिवारी यांनी केलं.