नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष अमित शाह यांचा भाजपाच्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाने सर्वात मोठा विजय संपन्न केला होता. त्यांनी आखलेल्या रणनीतीला कार्यकर्त्यांनी साथ दिली आणि भाजपाचा विजय सोपा झाला होता. आता आगामी निवडणुकीतही भाजपा कार्यकर्त्यांच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण यावेळेस भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी स्वत: निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. गांधीनगर येथील जागा अमित शाह यांनी लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 23 एप्रिलला येथे मतदान होणार आहे. सध्या या मतदार संघाचे नेतृत्व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी करत आहेत.
गांधीनगरच्या जागेवर कोणता उमेदवार उभा राहू शकतो याची चाचपणी भाजपाने केली. भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या सल्ला विचारण्यात आला. हे मत जाणून घेण्यासाठी भाजपाने पर्यवेक्षकांना गांधीनगर येथे पाठवले होते. पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी गांधीनगर येथून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे भाजपा आमदार किशोर चौहान यांनी सांगितले. मी पर्यवेक्षकांकडे याची मागणी केली होती आणि सर्वांनी याचे समर्थन केल्याचेही ते म्हणाले.
लालकृष्ण आडवाणी हे गांधीनगर विभागातील आहे. अमित शाह सरखेज मतदार संघातून आमदार होते जो लोकसभेत गांधीनगर मतदार संघात येतो. अमित शाह इथे प्रत्येकाला ओळखतात आणि हेच आमचे योग्य उमेदवार असतील असे चौहान म्हणाले. नारणपुरा, साणंद आणि साबरमती येथील आमदारांनी देखील अमित शाह यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. कोणत्याही भाजपा कार्यकर्ता किंवा नेत्याने गांधीनगरच्या जागेसाठी दावा केला नाही. तसेच एका स्वरात अमित शाह यांचे नावही सर्वांनी सुचवले आहे.