चित्रपटाला लाजवेल असा कट; वडिलांच्या हत्येचा बदला 22 वर्षांनी घेतला, पण एक चूक आणि आरोपी फसला

Man Kill Father Murderer After 22 Years: एका व्यक्तीने 22 वर्ष त्याच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. पण एक चूक आणि आरोपी पकडला गेला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 4, 2024, 11:17 AM IST
 चित्रपटाला लाजवेल असा कट; वडिलांच्या हत्येचा बदला 22 वर्षांनी घेतला, पण एक चूक आणि आरोपी फसला title=
man take revenge kill murderer of father after 22 year mow down from truck

Man Kill Father Murderer After 22 Years: बदलापूर चित्रपट तुम्ही पाहिलाय का? अभिनेता वरुण धवन चित्रपटात पत्नी आणि मुलीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी 20 वर्ष वाट पाहतो. या 20 वर्षात तो बदला घेण्यासाठी स्वतःलाच त्रास करुन घेत असतो. असाच काहीसा प्रकार अहमदाबाद येथे घडला आहे. जिथे आठ वर्षांच्या मुलाच्या मनात वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याची आग गेली 22 वर्षे धगधगत होती. वयाच्या 30व्या वर्षी त्याने वडिलांच्या हत्येचा बदला घेतला. सुरुवातीला पोलिसांनाही विश्वास ठेवणे जड गेले मात्र आरोपीची एक चूक आणि तो पकडला गेला. 

22 वर्षांपूर्वी काय झालं?

राजस्थानच्या जैसलमेर येथे घटनेची सुरुवात झाली. सुमारे 22 वर्षांपूर्वी एका मोठ्या ट्रकने 50 वर्षांच्या नखत सिंह भाटी याने त्याचा जानीदुश्मन हरि सिंह यांची हत्या केली. त्यानंतर कोर्टाने नखत आणि त्याच्या चार भावांना दोषी ठरवून सात वर्षांची शिक्षा सुनावली. 

शिक्षा संपल्यानंतर नखत सिंह भाटी अहमदाबाद येथे आला आणि सुरक्षारक्षकाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, एका तरुणाने नखतसिंह याला ट्रकने धडक दिली आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकचालकही घटनास्थळावरुन पळून गेला होता. आरोपीचे नाव गोपाल असल्याचं समोर आलं. सुरुवातीला वाहन चालवताना निष्काळजीपणा आणि हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला अटकही करण्यात आली. मात्र, जामीनपात्र गुन्हा असल्याने त्याला पोलिस ठाण्यातून जामीनदेखील मिळाला. पोलिसांनीच आरोपीला बेल मिळाली असून तु घरी जाऊ शकतोस, असं सांगितले. 

त्याचवेळी मयत व्यक्तीची कुटुंबीय अहमदाबाद येथे पोहोचले. तेव्हा लक्षात आलं की मयत व्यक्ती आणि आरोपी दोघांचे गाव आजूबाजूला आहे. तसंच, दोन्ही गावांमध्ये कित्येक वर्षांपासून वाद सुरू होता. तेव्हा पोलिसांना पहिला संशय आला. त्यांनी आरोपी गोपालचे फोन डिटेल्स शोधले. त्यात लक्षात आलं की आरोपी गेल्या काही दिवसांपासून नखत सिंहवर पाळत ठेवत आहे. तो राहत असलेल्या जागीदेखील त्याने रेकी केली होती.