Manipur Violence : गेल्या कित्येक दिवसांपासून मणिपूरमधील (Manipur) हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. देशाचे गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांच्या दौऱ्यानंतरही मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता नागरिकांच्या सुरक्षेचे कारण देत मणिपूरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा दलांनी (indian army) शनिवारी कांगली यावोल कन्ना लुप गटाच्या (केव्हायकेएल) 12 हल्लेखोरांना सोडून दिली आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनीच याबाबत माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी केव्हायकेएल गटाचे (KYKL) सुमारे डझनभर दहशतवादी इथम गावात लपले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवाद्यांना पकडले होते. त्याच वेळी, गावातील महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे 1500 लोकांच्या जमावाने लष्कराला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने माघार घेत 12 हल्लेखोरांना सोडून दिलं आहे.
मणिपूरमध्ये गेल्या 50 दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. पण अशातच आता महिलांच्या एका गटाने सुरक्षा जवानांवर हल्ला करून 12 हल्लेखोरांची सुटका केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलाच्या म्हणण्यानुसार, " इथम गावातील महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे 1500 लोकांच्या जमावाने सुरक्षा दलाच्या जवानांना घेरल्यानंतर 12 पकडलेल्या कांगले यावोल कन्ना लुप (KYKL) हल्लेखोरांना सोडून देण्यास भाग पाडले गेले आणि शोध मोहीम अयशस्वी झाली." एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.
"गुप्त माहितीच्या आधारे, दुपारी 2.30 च्या सुमारास सुरक्षा दलांनी इम्फाळ पूर्वेकडील इथम गावात कारवाई सुरू केली होती. ऑपरेशनचा एक भाग म्हणून सुरक्षा दलाकडून गावाला वेढा घातला गेला. त्यावेळी केव्हायकेएल गटाचे 12 हल्लेखोर शस्त्रे, दारुगोळ्यासह पकडले गेले. 2015 च्या डोग्रा अॅम्बश प्रकरणाचा मास्टरमाईंड स्वयंभू लेफ्टनंट कर्नल मोइरांगथेम तांबा उर्फ उत्तम हा सुद्धा या 12 लोकांमध्ये होता. त्यांना पकडल्यानंतर थोड्या वेळाने, महिला आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली 1200 ते 1500 लोकांच्या जमावाने कारवाई सुरु असलेल्या भागाला वेढा घातला आणि सुरक्षा दलांना पुढे जाण्यापासून रोखले. आक्रमक महिला जमावाने वारंवार- वारंवार लष्कराला विरोध केला. सुरक्षा दलांना कायद्यानुसार कारवाई चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. पण त्याचा काही उपयोग झाला नाही," अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
#WATCH | Manipur: Security forces launched an operation acting on specific intelligence, in village Itham in Imphal East district on 24th June. The operation resulted in apprehension of 12 KYKL cadres along with arms, ammunition and war-like stores. Self-Styled Lt Col Moirangthem… pic.twitter.com/B1yXoJ9WKo
— ANI (@ANI) June 25, 2023
महिलांची आक्रमकता पाहून 12 हल्लेखोरांना त्यांच्याकडे सोपवण्यात आले. मात्र सुरक्षा दलांनी त्यांच्याजवळ असलेली स्फोटके आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत. दुसरीकडे याआधीही मणिपूरमध्ये महिलांनी अशीच एक कारवाई थांबवली होती. 22 जून रोजी महिलांनी सीबीआयच्या पथकाला एका गावातून पुढे जाण्यापासून रोखले होते. सशस्त्र हल्लेखोर ज्या ठिकाणी गोळीबार करत होते तिथे महिलांनी सुरक्षा दलांना जाण्यापासून रोखले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.