मुंबई : भारतात कोरोनाच्या दुसर्या लाटेने बरीच घरे उध्वस्त केली, पण खरा फटका मुलांना बसला. कोरोनामुळे 500 हून अधिक मुलांनी आपल्या आई-वडिलांना गमावले आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचे संगोपन करणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशातील सर्व संस्था यासाठी आवाज उठवत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 'कोविड' च्या दुसर्या लाटेमुळे 577 मुलांनी आपले पालक गमावले. मुलांची देखभाल करण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालय राज्य सरकारांच्या संपर्कात आहे.
ज्या मुलांना कुटुंब मिळू शकले नाही किंवा ज्यांची अजून ही माहिती मिळालेली नाही अशा बालकांना अजूनही त्रास सहन करावा लागत आहे. सोशल मीडियावरील बर्याच पोस्ट व्हायरल आहेत, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की कोरोनामुळे पालकाला मृत्यू झाल्याने मूल अनाथ झाले आहे, ज्याला दत्तक घेण्याची आवश्यकता आहे.
महिला व बालविकास विभागाचे संचालक मनोजकुमार राय म्हणाले की, आजकाल सोशल मीडियावर मुलांचे फोटो शेअर केले जात आहे, हे योग्य नाही. बाल न्याय कायद्यात असे म्हटले आहे की या मुलांची ओळख उघडकीस येऊ नये.
कोरोनामुळे देशात थैमान सुरु असताना आता या अनाथ मुलांना आधाराची गरज आहे. या मुलांना आधार देण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा अशी मागणी होत आहे.