दावकी, मेघालय : आरशासारखी नदी कधी पाहिलीय का? आज आम्ही तुम्हाला आरशासारखा तळ असलेली नदी दाखवणार आहोत. आता तुम्ही म्हणाल अशी नदी पृथ्वीवर कुठं आहे तरी का? हो अशी नदी अस्तित्वात आहे. कल्पनेच्याही पलिकडं स्वच्छ असलेली या नदीत तुम्हाला कचऱ्याचा एक कपटाही दिसणार नाही. नदीचं पाणी एवढं स्वच्छ आहे की तुम्ही थेट नदीचा तळ पाहू शकता. नदीतील खडक आणि मासेही पाहू शकता. नदीचं नीळशार पाणी तुम्हाला एका वेगळ्याच जगात गेल्याचा स्वर्गीय आनंद देते. या नदीत कधीतरी ढग, कधीतरी आकाश स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळून पाहते की काय असं वाटतं. कधी काठावरचे खडक उगाचच नदीत वाकून पाहतात की काय असं वाटतं. निसर्गानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट किती शुद्ध असते याचा प्रत्यय या नदीच्या पाण्याकडं पाहिल्यावर येतो. प्रदूषित नद्यांच्या भारतात तुम्हा आम्हाला अशी नदी कुठं सापडणार.... पण ही नदी पाहण्यासाठी तुम्हाला पासपोर्टची गरज नाही. किंवा व्हिसाचीही गरज नाही. तुम्हाला ही नदी पाहण्यासाठी फक्त ईशान्येकडच्या राज्यांचा प्रवास करावा लागेल.
मेघालयमधील जयंतिया जिल्ह्यातल्या दावकी खेड्याजवळून उम्नगोत ही नदी वाहते. भारतातली सर्वात स्वच्छ नदी अशी ख्याती उम्नगोतची आहे. ही नदी पाहण्यासाठी शेकडो पर्यटक दावकी खेड्यात येतात.
उम्नगोतमध्ये बोटिंग करतात. तिचं तळ न्याहाळतात. नदी एवढी स्वच्छ ठेवण्यात गावकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. गावकरी नदी स्वच्छ ठेवतातच शिवाय इथं येणाऱ्या पर्यटकांनाही कचरा करू देत नाही. जे पर्यावरणविषयक नियम मोडतात त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाते.
तुमच्या गावाजवळची तुमच्या शहराजवळची नदीही उम्नगोतसारखी होऊ शकते. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती हवी... जेव्हा ही इच्छाशक्ती प्रत्येक नागरिकात निर्माण होईल तेव्हा उम्नगोत नदीशी स्वच्छतेबाबत प्रत्येक नदी स्पर्धा करेल यात शंका नाही.