Meta : गेल्या काही दिवसांपासून जगभरातील कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरची सुत्रे हाती घेताच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली. त्यापाठोपाठ फेसबुक, व्हॉट्सअॅपची मातृकंपनी असलेल्या मेटाने (Meta) जगभरातील तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले (mass layoffs). यामध्ये भारतातील कर्मचाऱ्यांची संख्या मोठी होती. यामध्ये अर्पण तिवारी हे भारतीय नाव देखील होते.
कुटुंबासोबत असतानाच मिळाली माहिती
मेटा सिंगापूर येथे एचआर म्हणून काम करणारा अर्पण तिवारी दिवाळीच्या सुट्टीनिमित्त भारतात आला होता. कुटुंबासोबत असतानाच अर्पण यांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली. पण अर्पण यांनी याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली नाही. कुटुबियांसोबत वेळ घालवत असतानाच एवढी वाईट बातमी मिळेल याची कल्पनाही अर्पण तिवारी यांना नव्हती.
घरच्यांपासून लपवून ठेवली बातमी
तिवारी यांनी ही बातमी आपल्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवली आहे. मनीकंट्रोलसोबत बोलत असताना अर्पण तिवारी यांनी सांगितले की, मला माझ्या पालकांना आणखी त्रास द्यायचा नाही आणि नवीन नोकरी मिळाल्यावरच सांगेन मी त्यांना याबाबत सांगेन.
मानसिक आरोग्य बिघडलं
अर्पण तिवारी हे सध्या नव्या नोकरीच्या शोधात आहेत. नवी नोकरी मिळल्यानंतर मेटामधील नोकरी गेल्याची माहिती देणार आहे अर्पण तिवारी यांनी म्हटले आहे. पण या परिस्थितीचा सामना करताना मानसिक आरोग्य बिघडलं आहे. रोज त्यांचे चेहरे बघून, त्यांच्याशी खोटं बोलावं लागतं. हे सर्व वेदनादायक आहे, असेही अर्पण तिवारी म्हणाले.
कर्मचारी कपात कशासाठी?
"करोनाकाळात अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली होती. साथ ओसरल्यानंतरही व्यवसाय कायम राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे सर्वच माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. वाढती स्पर्धा आणि घटणाऱ्या जाहिरातींमुळे आपला महसूल अपेक्षेपेक्षा कितीतरी प्रमाणात घटला आहे. त्यामुळे कर्मचारी कपात करावी लागत आहे," असे मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.