मुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते?

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 24, 2025, 08:52 PM IST
मुंबईतील सभेत आमदार, खासदारांची दांडी; उद्धव ठाकरेंची होणार कोंडी? कोण आहेत हे नेते? title=

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना बळ वाढवण्याच्या सूचनाही उद्धव यांनी केल्या आहेत. मात्र त्यांच्या आमदार खासदारांच्या मनात नेमकं काय चालू आहे याबाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. याला कारण बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलंय. 

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्त शिवसेना ठाकरे पक्षानं आयोजित केलेल्या मेळाव्याला काही आमदार आणि खासदारांनी दांडी मारली...खासदार-आमदारांच्या अनुपस्थितीनं अनेक चर्चांना उधाण आलंय...ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 खासदार आणि 3 आमदारांसह  2 माजी आमदार या मेळाव्याला अनुपस्थित होते.

ठाकरेंच्या मेळाव्याला कुणाची दांडी?

- यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर. परभणीचे खासदार बंडू जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील हे खासदार या मेळाव्याला आलेच नाहीत. तर दिलीप सोपल, बाबाजी काळे, आणि राहुल पाटील हे आमदारही मेळाव्याला गैरहजर होते. या व्यतिरिक्त माजी आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिलीय. आमच्या मतांवर डाका टाकून झालाय आता पक्षांवर टाकताहेत, अशा शब्दात पटोलेंनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उदय सामंतांचा खळबजनक दावा

आमदार-खासदारांच्या अनुपस्थितीला उदय सामंतांच्या वक्तव्याची पार्श्वभूमी असल्याची चर्चा सुरू झालीय. दावोस दौ-यावर असताना उदय सामंतांनी खळबजनक दावा केला होता. ठाकरेंचे शिवसेनेतील आमदार आणि खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा सामंतांनी केला होता. त्यानंतर मुंबईत दाखल झाल्यावरही उदय सामंत आपल्या दावावर ठाम होते.

एकनाथ शिंदेंच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला. आमदार-खासदारांसह शिंदे भाजपसोबत सत्तेत सामील झाले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी पक्षावरची आपली पकड मजबूत असल्याचं दाखवून दिलंय. आता ठाकरेंकडे असलेल्या लोकप्रतिनिधींसाठीही शिवसेना शिंदे पक्ष रेड कार्पेट अंथरायला तयार आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा ठाकरेंना धक्का देण्याची तयारी शिंदेंनी केली का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.