शरद पवारांचा निवृत्तीनंतर कोल्हापुरात राहण्याचा विचार होता, अशी माहिती त्यांच्या कन्या सुप्रिया सुळेंनी दिलीय. सुळेंच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांच्या कोल्हापूरवरील प्रेमाची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर हे शरद पवारांचं आजोळ, कोल्हापूरचा शरद पवारांना विशेष लळा आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत, पाहुयात याविषयीचा एक रिपोर्ट.
रांगड्या कोल्हापुरातील रांगडी माणसं नेहमीच शरद पवारांना भावणारी ठरली आहेत. राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात याच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरनं शरद पवार यांना साथ दिली होती. कोल्हापूर हे शरद पवारांचं आजोळ. त्यामुळं मामाच्या गावाला जायला कोणाला आवडणार नाही. कोल्हापुरात आल्यावर पवारांना आपल्या आजोळी आल्याचा अनुभव मिळत राहिलाय. कोल्हापूर हे राजर्षी शाहू महाराज यांचं पुरोगामी आणि समतावादी शहर... त्यामुळं पवारांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम. इथली माणसं बोलायला रांगडी पण त्यांचा असणारा मृदू स्वभाव, चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं....इथलं खानपान, राहण्यासाठी स्वच्छ हवामान त्यामुळे शरद पवार हे नेहमीच कोल्हापूरच्या प्रेमात असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवारांनी कोल्हापूरवरचं प्रेम जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवलंय. राजकीय निवृत्तीनंतर आपण कोल्हापुरात वास्तव्यास येणार असं देखील पवारांनी ठरवलं होतं. पण राजकारणातून निवृत्त होतील ते पवार कसले. स्वतः शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांनी देखील शरद पवार आणि कोल्हापूरचे ऋणानुबंध कसे घट्ट आहेते हे बोलून दाखवलं आहे.
कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातलं गोळीवडे, हे शरद पवारांच्या मामांचं गाव. काही वर्षांपूर्वी पवारांनी गोळीवडे गावला भेट देऊन मोठा निधी दिला. या गावाच्या ऋणातून उतराई होण्याचा पवारांनी प्रयत्न केला. पवारांचा मित्र परिवार याच कोल्हापुरातला. कोल्हापूर हे पवारांचं फक्त आजोळ नाही तर त्याची मोठी बहीण, पुतणी आणि अनेक नातेवाईक याच कोल्हापुरात स्थायिक आहेत. त्यामुळं कोल्हापूर म्हटलं की पवारांना आपल्या गावी आल्याची अनुभूती मिळते.
कोल्हापूरची ताजी हवा, इथलं वातावरण आणि अस्सल गावरान पद्धतीचं मटण शरद पवारांना अत्यंत प्रिय. त्यामुळे जेव्हा केव्हा राजकीय निवृत्ती घेईन त्यावेळेला मी कोल्हापूरला स्थायिक होईन असं अनेक कार्यक्रमात त्याचबरोबर जुन्या सहकाऱ्यांना पवारांनी इच्छा बोलून दाखवली आहे.
शरद पवार यांच्या पक्ष उभारणीच्या काळात याच कोल्हापूरनं पवारांना भक्कम आधार दिला होता. त्यामुळं शरद पवार आणि कोल्हापूर याचे ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले. असं असलं तरी राजकीय निवृत्तीनंतर शरद पवार हे खरंच कोल्हापुरात स्थायिक होणार का, याचं कोल्हापूरकरांना कुतूहल लागून राहिलं आहे.