'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर...'

छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या लेझीम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2025, 10:01 PM IST
'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर...' title=

विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा 'छावा' चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात अडकला आहे. नुकताच चित्रपटाला ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज आणि रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमधील एका दृश्यात दोघं लेझीम नृत्य करताना दिसत आहेत. दरम्यान  छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या लेझीम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे. तर दुसरीकडे लेझीमच्या दृश्यावर चित्रपटाच्या टीमनं दक्षता घ्यायला हवी होती असं खासदार अमोल कोल्हे यांनी मांडलं आहे. तसंच संभाजीराजे छत्रपती यांनी यावर चर्चा व्हायला हवी असं म्हटलं आहे.  

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

"फक्त ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय आहे, याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे. हे आपलं पारंपरिक नृत्य आहे आणि या चित्रपटात या नृत्याची पेरणी नेमकी कशा अर्थाने करण्यात आली आहे, या मागचा उद्देश नेमका काय? हे चित्रपट पाहिल्या शिवाय लक्षात येणार नाही. म्ही स्वराज्यरक्षक मालिका साकारताना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेतली होती. तशाच प्रकारे छावाच्या संपूर्ण टीमने ही याची खबरदारी घेतली असेल आणि ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असं मला व्यक्तिगत वाटतं," असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. 

पुढे ते म्हणाले, "आपल्या महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे, यामुळं यापुढं ही आपल्या महाराजांचा इतिहास जगासमोर येत राहील". 

संभाजीराजे छत्रपती यांनी यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं मत मांडत म्हटलं की, "ट्रेलरमध्ये संभाजी महाराज लेझीम डान्सच्या रुपात खेळताना दाखवण्यात आलं आहे. लेझीम आपला सांस्कृतिक ठेवा आणि ते खेळणं चुकीचं नाही. पण एका गाण्याच्या स्वरुपात आपला आनंदोत्सव साजरा करत असताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं कितपत योग्य आहे, नाही यावर चर्चा होणं गरजेचं आहे".