... तर तुमचे Paytm, Amazon Pay बंद होण्याची शक्यता

नोटाबंदीनंतर पेटीएम आणि अन्य मोबाईल वॉलेटचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Updated: Jan 11, 2019, 12:39 PM IST
... तर तुमचे Paytm, Amazon Pay बंद होण्याची शक्यता title=

मुंबई - नोटाबंदीनंतर पेटीएम आणि अन्य मोबाईल वॉलेटचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता अगदी चहाचे बिल देण्यापासून ते कपडे खरेदी करण्यापर्यंत मोबाईल वॉलेटचा वापर केला जातो. पण रिझर्व्ह बॅंकेने मोबाईल वॉलेट कंपन्यांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत केवायसी (नो युअर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसे केले नाही तर १ मार्चपासून तुमचे मोबाईल वॉलेट खाते बंद केले जाण्याची शक्यता आहे. मोबाईल वॉलेटचा वापर करणारे ग्राहक कोण आहेत. याची माहिती केवायसीच्या माध्यमातून पूर्ण होते. पण पेटीएमसह अनेक मोबाईल वॉलेट कंपन्यांनी अद्याप त्यांच्याकडील सर्व ग्राहकांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. 

आपल्याकडील सर्व ग्राहकांची केवायसी प्रक्रिया फेब्रुवारी २०१९ अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे जवळपास सर्वच मोबाईल वॉलेट कंपन्यांना वाटते आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये रिझर्व्ह बॅंकेने सर्व मोबाईल वॉलेट कंपन्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. इकॉनॉमिक टाइम्समधील वृत्तानुसार, मोबाईल वॉलेट कंपन्यांनी खूप कमी लोकांकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या ग्राहकांचे बायोमेट्रिक किंवा फिजिकल पडताळणी केलेली नाही. त्यामुळे त्यांना आता अडचण निर्माण होणार आहे. 

खासगी कंपन्यांना ग्राहकांच्या पडताळणीसाठी आधार क्रमांकाचा वापर करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दिलेल्या निकालात म्हटले होते. त्यामुळे मोबाईल वॉलेट कंपन्या या पद्धतीने केवायसीसाठी पडताळणी करू शकणार नाहीत. व्हिडिओ व्हेरिफिकेशन किंवा एक्सएमएल व्हेरिफिकेशनला रिझर्व्ह बॅंकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे केवायसीसाठी ग्राहकाची पडताळणी कशी करायची असा प्रश्न मोबाईल वॉलेट कंपन्यांपुढे उभा आहे. 

चार वर्षांपूर्वी मोबाईल वॉलेटची देशात सुरुवात झाली होती. त्यावेळच्या तुलनेत आता या क्षेत्रात फार मर्यादित कंपन्या आहेत. यामध्ये पेटीएम, मोबीक्वीक, फोन-पे, अमेझॉन-पे यांचा समावेश आहे.