मुंबई : केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अनेक राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. त्यामुळे काही शहरांमध्ये पुन्हा नाईट कर्फ्यू म्हणजेच रात्रीची संचारबंदी लावण्याची नामुष्की ओढावली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि इंदूर शहरातही १७ मार्चपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याबाबत आज घोषणा करण्यात आली. याशिवाय जबलपूर, ग्वाल्हेर, छिंदवाडा, उज्जैन, रतलाम, बेतूल, खरगोन या शहरांमध्ये रात्री १० नंतर बाजार बंद करण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये संचारबंदी नाहीये, मात्र निर्बंध घालण्यात आले आहेत.
गुजरात सरकारनेही ४ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद, बडोदा, सूरत आणि राजकोटमध्ये आता रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी असेल. याआधी हा कर्फ्यू मध्यरात्री १२ वाजता लागायचा. ३१ मार्चपर्यंत ही संचारबंदी कायम असणार आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्बंध वाढवण्यात आले आहेत.
उपराजधानी नागपुरात तर लॉकडाऊनच जाहीर करण्यात आला आहे.
मुंबईतही रात्रीची संचारबंदी लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
नाशिकमध्ये नुकताच विकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेला, ज्यामधअये जीवनावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद ठेवण्यात आलेली.
याशिवाय औरंगाबाद, पिंपरी, परभणी यांसारख्या शहरांतही निर्बंध लावण्यात आलेले.
देशाचा विचार केला तर महाराष्ट्रासोबतच गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.