Car Discount Offers: सणा-सुदीचे दिवस येताच अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक डिस्काउंट देतात. सिझनच्या आधी ऑटो कंपन्या म्हणजेच कार बनवणाऱ्या कंपन्यांपासून ते लक्झरी कार बनवणाऱ्या कंपन्या आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांपर्यंत सगळ्यांनी एक डील केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, जर एखादा व्यक्ती त्याची जुनी गाडी स्क्रॅप करुन नवीन गाडी खरेदी करत असेल तर त्या व्यक्तीला नवीन गाडीवर 1.5 ते 3.5 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. पण या निर्णयामागे रस्ते विकास आणि परिवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांचा हात असल्याचे बोललं जात आहे. नेमकं काय आहे प्रकरण?
टाइम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनुसार,काही टॉप लक्झरी कार कंपन्या जवळपास 25 हजारापर्यंतचा डिस्काउंट देण्यासाठी तयार झाले आहेत. तर, इतर कंपन्याही तितकाच डिस्काउंट देतील अशी अपेक्षा आहे. ऑटो इंडस्ट्री आणि सरकार या प्लानची घोषणा लवकरच करणार असल्याची माहिती समोर येतेय. मार्च 2021मध्ये नितीन गडकरी यांनी स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केल्यानंतर गडकरी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ग्राहकांना त्यांच्या जुन्या कार स्क्रॅप करुन त्यावर डिस्काउंट आणि कमी जीएसटी यासारखी सूट मिळण्याची गरज आहे.
2022 मध्ये, मंत्रालयाने ऑटोमोबाईल युनियन्सना त्यांच्या ग्राहकांना स्क्रॅपिंग वाहनांच्या बदल्यात विक्रीच्या किंमतीवर 5% पर्यंत सूट देण्यास सांगितले होते. परंतु कंपन्यांनी या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. सरकारने 60 नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा आणि 75 स्वयंचलित चाचणी केंद्रे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 26 जुलै 2019 रोजी मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामध्ये सरकारी विभागाच्या 15 वर्षाहून जुन्या वाहनांना भंगारात काढावे अशी तरतूद करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर देशात स्क्रॅपिंग पॉलिसी अंमलात आणली. जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर आपल्याला पाच टक्क्यांपर्यंतची सूट मिळेल. मात्र या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे.