Bihar Political Crisis: बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा नवी समीकरणे पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा दिला आहे. नितीश यांनी राष्ट्रीय जनला दल आणि काँग्रेसचा हात सोडत भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. आज संध्याकाळी ते नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या पाठिंब्याने ते नव्याने सरकार स्थापन करणार आहेत. नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय इंडिया आघाडीला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
नितीश कुमार यांनी राज्यपालांना भाजपच्या समर्थनाचे पत्रही सोपवले आहे. राजभवनातून परतल्यानंतर नितीश यांनी त्यांच्या राजीनाम्याबद्दल खुलासा केला आहे. नितीश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे की, मी राजीनामा दिला आहे आणि जे आधीच सरकार होतं ते आता समाप्त केलं आहे. याचे कारण म्हणजे खूप गोष्टी घडत होत्या म्हणून आम्ही सरकारची समाप्त केले. अशा काही गोष्टी घडल्या की नवीन सरकार स्थापन करण्याची वेळ आली. तिथे परिस्थिती बिघडली होती म्हणून राजीनामा दिला. आम्ही नवीन युती स्थापन केली आहे. मात्र तिथे हे लोक काहीच करु शकत नाही. त्यामुळं मी सगळ्यांचे ऐकून घेतले आणि तेव्हाच साथ सोडली, अशा शब्दांत नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.
बिहारमध्ये नवीन सरकारचा फॉर्म्युला आधीच ठरवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर, भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. भाजपच्या बैठकीत सम्राट चौधरी यांना विधीमंडळाचे नेतेपद तर विजय सिन्हा यांना उपनेतेपद देण्याचा ठराव मंजूर झाला आहे.
महागठबंधनची साथ सोडून भाजपसोबत जात असलेले नितीश कुमार आज संध्याकाळी 4 वाजता पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. ते नवव्यांदा मुख्यमंत्री होतील. पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर नितीश कुमार यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.
नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्री
- 3 मार्च 2000
- 24 नोव्हेंबर 2005
- 26 नोव्हेंबर 2010
- 22 फेब्रुवारी 2015
- 22 नोव्हेंबर 2015
- 27 जुलै 2017
- 16 नोव्हेंबर 2020
- 9 ऑगस्ट 2022