नवी दिल्ली : देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ८,३५६वर पोहोचली आहे. मागच्या २४ तासामध्ये कोरोनामुळे ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०९ नवे रुग्ण सापडले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत २७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७१६ जण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.
२९ मार्चला कोरोनाग्रस्तांची संख्या ९७९ एवढी होती, ती आता ८,३५६ पर्यंत पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना आयसीयू आणि व्हॅन्टिलेटरची गरज आहे. जवळपास १,०७६ रुग्णांना ऑक्सिजन व्हॅन्टिलेटर आणि आयसीयूची गरज पडेल, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.
आयसीयू व्हॅन्टिलेटर आणि दुसऱ्या वैद्यकीय उपकरणांवरून गोंधळ होऊ नये, म्हणून आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढताच रुग्णालयांची आणि बेडची संख्या वाढवली जात आहे.
'काही ठिकाणी लष्कर मदत करत आहे. आंतरराज्यीय कार्गोच्या वाहतुकीवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनावर कोणतीही बंदी घातलेली नाही. गोदामं आणि कोल्ड स्टोरेज प्रत्येक वस्तूंचा साठा करू शकतात. सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. सायबर क्राईमबाबतही जागृकता पसरवली जात आहे,' असं गृहमंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं.
'प्रत्येक राज्यात लॉकडाऊनचं पालन होत आहे. प्रत्येक घरावर लक्ष ठेवलं जात आहे. ग्रामीण भागात अन्न वाटपाचं काम सुरू आहे. आंतरराज्यीय कार्गोच्या वाहतुकीवर बंदी नसल्याचं राज्यांनी सांगितलं आहे,' अशी प्रतिक्रिया गृहमंत्रालयाकडून देण्यात आली.