शिक्षक शिकवत असतानाच तो वर्गाबाहेर पडला अन् तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी, घटना CCTV मध्ये कैद

CCTV Video: वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतानाच अचानक हा विद्यार्थी त्याच्या बेंचवरुन उठला आणि वर्गाबाहेर चालत गेला. त्यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून अनेकांचं मन सुन्न झालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 24, 2025, 09:37 AM IST
शिक्षक शिकवत असतानाच तो वर्गाबाहेर पडला अन् तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी, घटना CCTV मध्ये कैद title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर झालाय व्हायरल

CCTV Video: आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका कॉलेजमधील विद्यार्थ्यांने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम कॉलेजमधील वर्गात आणि पॅसेजमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. लेक्चर सुरु असतानाच अचानक हा मुलगा जागेवरुन उठला आणि कोणालाही काहीही न सांगता वर्गाबाहेर गेला. तिथून तो पॅसेजच्या कठड्यावर चढला आणि त्याने खाली उडी मारली. या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घटनेचा मन पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या विद्यार्थाचं नाव चरण असं असून तो नारायण कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत होता. वर्गात शिक्षक शिकवत असताना अचानक चरण त्याच्या बेंचवरुन उठला. कोणाशीही काहीही न बोलता तो शिक्षकांसमोरुन चालत वर्गाबाहेर गेला. वर्गाबाहेर गेल्यानंतर समोरच्या पॅसेजमध्ये असलेल्या कठड्यावर तो चढला आणि कोणाला काही समजण्याआधीच त्याने स्वत:ला खाली झोकून दिलं. चरणने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्याचं समल्यानंतर वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाबाहेर धावल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झालं आहे.

पोलिसांचं म्हणणं काय?

या प्रकारामुळे चरणसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. अनंतपूरम ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी टी वेंगटशलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, चरण हा संक्रांतीच्या सुट्ट्या संपल्यानंतर गुरुवारी वर्गात परतला होता. त्याचा सकाळी 11 वाजून 55 मिनिटांनी मृत्यू झाला. "संक्रांतीची सुट्टी संपल्यानंतर चरण हा सकाळी 9.30 ला कॉलेजला आहे. वर्ग सुरु असताना सकाळी 11.55 वाजता चरण चालत वर्गाबाहेर आला आणि त्याने तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली," असं टी वेंगटशलू यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. 

टोकाचं पाऊल का उचललं? गूढ कायम

चरणला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आळं. मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करुन घेण्यापूर्वीच मृत घोषित केलं. चरणने आत्महत्या का केली याचं गूढ अद्याप उलगडेलेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असून या प्रकरणासंदर्भात आता शाळेतील विद्यार्थ्यांपासून चरणच्या घरच्या मंडळींपर्यंत सर्वांची चौकसी केली जात आहे. पोलिसांनी चरणच्या पालकांना तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला असून त्यानंतरच कायदेशीर कारवाई सुरु होईल अशी माहिती समोर येत आहे.