Vicky Kaushal On Playing Chhatrapati Sambhaji Maharaj: अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंधानाने येसूबाईंची भूमिका साकारली असून सैफ अली खान हा औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईमधील एका विशेष सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. 'छावा'चं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. 'छावा'चा ट्रेलर सध्या चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी विकीने संभाजी महाराज साकरण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे.
'छावा'च्या ट्रेलरमध्ये विकीचा दमदार अभिनय, संवाद फेकण्याची शैली आणि लूक चाहत्यांना प्रचंड आवडल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियावरुन पाहायला मिळत आहे. ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकरतानाचे अनुभव विकीने शेअर केले. "आम्ही 'छावा'साठी तयारी सुरु केली तेव्हा मी उतेकर सरांना रोज भेटायचो. आम्ही स्क्रीप्ट वाचून त्यावर रिसर्च करायचो. माझ्या मनात अनेक प्रश्न होतो. मात्र संपूर्ण इतिहास समजून घेतल्यानंतर मी त्यांना माझ्या भूमिकेसाठी कशी आणि काय तयारी करु असा प्रश्न विचारला. त्यावेळेस त्यांनी मला केवळ एकच वाक्य सांगितलं. "विकी मला पडद्यावर सिंहासारखं व्यक्तीमत्व दाखवायचं आहे," असं ते म्हणाले. तू साकारत असलेली व्यक्तीरेखा चालताना, बोलताना, युद्धात किंवा अगदी शांतपणे ऐकून घेतानाही सिंहासारखी वाटली पाहिली. तुझ्या शरीरातील प्रत्येक पेशीला तू खरोखरच सिंह असल्यासारखं वाटलं पाहिजे. मला अपेक्षा आहे की प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट पाहतील तेव्हा त्यांनाही असेच वाटेल," अशी अपेक्षा विकीने व्यक्त केली आहे.
"लक्ष्मण सरांकडून मला आत्मविश्वास मिळाला. त्यांनी एकदा मला 'छावा' हा चित्रपट माझ्यासाठी फार खासगी आहे. जेव्हा दिग्दर्शक असं काहीतरी बोलतो तेव्हा तुम्हाला फार आत्मविश्वास मिळतो कारण हे असं काही ऐकल्यावर चित्रपटामध्ये जे काही होईल ते फार प्रमाणिकपणे आणि खरं असेल हे स्पष्ट असतं. भूमिकेसाठी तयारी करताना मी अॅक्शन सीनसाठी फार प्रशिक्षण घेतलं. 'सॅम बहादूर'नंतर मी 'छावा'च्या तयारीसाठी सात महिन्याचा ब्रेक घेतला होता. मी घोडेस्वारी शिकलो. तलवार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा गाभा योग्य पद्धतीने पडद्यावर साकरणं हे सर्वात आव्हानात्मक होतं. यासाठी मी पूर्णपणे उतेकर सरांवर अवलंबून होतो," असंही विकी या चित्रपटासाठी केलेल्या तयारीबद्दलची माहिती देताना म्हणाला.
'छावा' चित्रपटासाठी तयारी करताना विकीला वजनही वाढवावं लागलं. याबद्दल बोलताना त्याने, "उरी हा मी केलेला शेवटचा अॅक्शन सिनेमा होता. 'छावा'मध्ये मला एवढे अॅक्शन सीन करावे लागतील असं वाटलं नव्हतं. मी सात महिने प्रशिक्षण घेतलं. मी या भूमिकेसाठी वजनही वाढवलं. मी 80 किलोवरुन वजन वाढवत 105 किलोपर्यंत नेलं. माझ्याकडे जे काही होतं ते सारं मी मन लावून या चित्रपटामध्ये ओतलं आहे," अशा भावना विकीने व्यक्त केल्या. म्हणजेच 'विकी'ने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी तब्बल 25 किलो वजन वाढवलं.