Virender Sehwag Divorce: भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहवालत हे दोघे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. लग्नाच्या 20 वर्षानंतर दोघे विभक्त होणार आहेत. सेहवाग आणि आरतीने 2004 साली लग्न केलं होतं. या दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. याच कारणामुळे दोघे विभक्त होणार अशी चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेहवाग आणि आरती मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळे राहत आहेत. लवकरच हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं वृत्त आहे.
विरेंद्र सेहवाग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखायला जायचा. आरती आणि सेहवागला दोन मुलं आहेत. आर्यवीरचा जन्म 2007 साली झाला असून धाकटा मुलगा वेदांतचा जन्म 2010 चा आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून एकत्र असतानाही मागील काही काळापासून दोघांमध्ये बरेच मतभेद निर्माण झाले असून दोघे एकमेकांपासून दूरावले आहेत. विरेंद्र सेहवागने दिवाळीमध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो त्याची दोन्ही मुलं आणि आईबरोबर दिसला. मात्र या फोटोंमध्ये आरती दिसली नव्हती किंवा तिचा उल्लेखही केला नव्हता. तेव्हाच चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. चाहत्यांमध्ये चर्चा असतानाही दोघांकडून कोणतीच प्रतिक्रिया नोंदवण्यात आलेली नसल्याने दोघे लवकरच घटस्फोट घेणार असं अनेक वेबसाईट्सने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
दोन आठवड्यांपूर्ण सेहवागने पल्लकडमधील विश्व नागयाकाशी मंदिराला भेट दिली होती. या दौऱ्यातील काही फोटोही शेअर केले होते. मात्र या पोस्टमध्येही आरतीचा उल्लेख नव्हता. यावरुन खरोखरच दोघे एकमेकांपासून दूर गेल्याचं अधोरेखित केलं जात आहे. सेहवागने यावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. मात्र सार्वजनिक जीवनातून दोघांनीही एकमेकांपासून दुरावा ठेवल्याने दोघं विभक्त होणार अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे.
आरती अहवालत ही मूळची दिल्लीची असून ती फारशी प्रकाशझोतात आलेली नाही. आरतीचा जन्म 16 डिसेंबर 1980 चा असून तिने लेडी आर्यवीन सेकेंडरी स्कूलमधून आणि भारतीय विद्या भवन येथून शिक्षण पूर्ण केलं आहे. दिल्ली विद्यापिठातून तिने कंप्युटर सायन्समध्ये डिप्लोमापर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
सेहवाग आणि आरती हे 2000 सालाच्या आसपास एकमेकांच्या प्रेमात पडले. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या घरी झालेल्या आलिशान लग्न सोहळ्यामध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते. अनेक वर्षांपासून आरती खंबीरपणे सेहवागच्या पाठीशी उभी राहिली. मात्र आता दोघांमधील दुरावा नजरेत भरेल इतका वाढला आहे. त्यामुळेच ते लवकरच विभक्त होण्याची घोषणा करतील असं निकटवर्तीय सुत्रांनी सांगितलं आहे. सेहवाग हा 2015 साली अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सेहवाग सध्या स्वत:ची क्रिकेट अकादमी चालवतो.