World News : अवकाश आणि अवकाशाशी संबंधित अनेक संज्ञा, संकल्पना या गोष्टींविषयी कायमच कुतूहल पाहायला मिळतं. जगभरातील विविध देशांच्या विविध अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं या अनोख्या विश्वाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत असतानाच नुकत्याच घडलेल्या एका घडनेनं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं. ही घटना केनियामध्ये घडली असून, इथं नैरोबीच्या दक्षिण पूर्वेला एका लहानशा गावामध्ये 30 डिसेंबर 2024 रोजी एक विचित्र घटना घडल्याचं वृत्त समोर येत आहे.
अचानकच इथं आकाशातून प्रचंड वजनाची एक धातूची वर्तुळाकार वस्तू आकाशातून पडली आणि एकच खळबळ माजली. प्राथमिक माहितीनुसार ही वर्तुळाकार वस्तू एखाद्या रिंगसमान असून, तिचा व्यास 8.2 फूट आणि वजन साधारण 500 किलोग्रॅमच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे. ही वस्तू नेमकी काय आहे, एलियनचा तिच्याशी काही संबंध आहे का, समांतर विश्वाशी या वस्तूचं काही नातं आहे का? हे आणि असे कैक प्रश्न ही बातमी समोर येताच उपस्थित करण्यात आले. ज्यानंतर अखेर केनियातील अवकाश संशोधन संस्थेनं यासदंर्भात एक मोठा खुलासा केला.
आकाशातून पृथ्वीवर कोसळलेली ही वस्तू पाहिल्यानंतर काही प्राथमिक अंदाज आणि निष्कर्ष काढण्यात आले. जिथं, केनियाच्या अंतराळ संस्थेनं म्हणजेच केएसएनं दिलेल्या माहितीनुसार ही वस्तू एका अंतराळ प्रक्षेपण यानापासून वेगळा झालेला भाग आहे. हे स्पष्टीकरण पाहता घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचच संस्थेनं सुचवलं.
असं असलं तरीही आकाशातून पृथ्वीवर कोसळलेल्या या वस्तूमुळं नागरिकांमध्ये मात्र प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. स्थानिकांनी आणि प्रथमदर्शनी जगभरातील अनेकांनीच हा भाग एखाद्या एलियनच्या यानाचाच भाग असावा असाही तर्क लावला. पण, आता मात्र हे चित्र स्पष्ट झाल्यानं अनेकांनाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळाही ही बाब नाकारता येत नाही.
केनियातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर घटनेची सखोल चौकशी होणार असून, घडला प्रकार अनावधानानं घडला असल्यास अशी चूक झालीच कशी आणि हा प्रकार नेमका कसा थांबवता आला असता या दिशेनं तपास सुरू केला आहे. दरम्यान, हा धातूचा मोठाला तुकडा नेमका कोणत्या गोष्टीचा आहे याची अधिकृत माहिती मात्र अद्यापही प्रतीक्षेत असल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे सदर घटनेनंतर पुन्हा एकदा अंतराळातील कचऱ्याचा मुद्दा डोकं वर काढताना दिसत असून, अंतराळविषयक मोहिमांनंतर अनेक प्रकारच्या यानांचे अवशेष, रॉकेटचे लहानसे तुकडे किंबहुना रॉकेट, यानाचे काही भाग अनेकदा पृथ्वीवर कोसळतात आणि या ग्रहालाही धोका पोहोचवतात. नासाच्या माहितीनुसार पृथ्वीभोवती अशा यानांचे असंख्य तुकडे असून ही अतिशय गंभीर बाब आहे.