नवी दिल्ली : ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन याला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे आता हमजाच्या प्रवासावर, शस्त्रास्त्र खरेदीवर निर्बंध येणार आहेत. तसेच त्याच्याकडे असलेल्या मालमत्ता देखील गोठवल्या जाणार आहेत. हमजाकडे ओसामाचा वारसदार म्हणून पाहिला जात आहे. पुलवामाच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत जैश ए मोहम्मदच्या हात धुवून मागे लागला आहे. दहशतवादी संघटनेला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानचीही आता भांबेरी उडाली आहे. भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे. पाकिस्तानने यांच्यावर कारवाई करावी हे वारंवार सांगून झाले आहे. पण पाकिस्तान आम्ही पवित्रच असल्याच्या भूमिकेत आहे. त्यानंतर दुसरे राष्ट्रांना पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक करावे लागते.
दुसरी राष्ट्र आपल्या देशात येऊन दहशतवाद्यांचा खात्मा करतात, त्याचे पुरावेही देतात हे पाकिस्तानलाही लज्जास्पद वाटते. पण आता पाणी त्यांच्याही डोक्यावरून गेल्याचे जाणवत आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्यास भारत पुढाकार घेत आहे. पण चीन यामध्ये आडकाठी आणत आहे. त्यात आता हमजा बिन लादेनला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. सध्या अल कायदाची धुरा आयमन अल जवाहिरी या क्रूरकर्म्याकडे आहे. त्याच्यानंतर हमजाकडे अल कायदाची धुरा सोपवली जाईल अशी शक्यता आहे.
त्यामुळे सुरक्षा परिषदेने २९ वर्षीय हमजावर तातडीने निर्बंध लागू केलेत. अमेरिकेने दोनच दिवसांपूर्वी हमजावर इनाम जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने सुरक्षा परिषदेने हमजाला काळ्या यादीत टाकले.