Love Marriage : गेल्या काही दिवसांपासून प्रेमविवाहांमुळे अनेक गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यानंतर आता गुजरातमध्ये (Gujarat News) प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी घेण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. अशातच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी प्रेमविवाहाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जर घटनात्मकदृष्ट्या हे शक्य असेल तर आमचं सरकार (gujarat govt) प्रेमविवाहांसाठी पालकांची संमती अनिवार्य करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करेल, असे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (CM Bhupendra Patel) यांनी म्हटलं आहे. पाटीदार समाजाच्या एका वर्गाने प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी केली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले की, आमचे सरकार प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची तरतूद घटनात्मक मर्यादेत करता येईल का याचा अभ्यास करेल. पाटीदार समाजातील काही घटकांनी प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याच्या मागणीला उत्तर देताना पटेल यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, गुजरातचे प्रसिद्ध लेखक जय वसावडा यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही मागणी करणाऱ्यांना तालिबानचे अनुकरण करणारे म्हटले आहे. 'सरकारला माहीत नाही, पण अशा मागण्या करणारे तालिबानचे अनुकरण करणारे आहेत. अशी मूर्खपणाची आणि हास्यास्पद संकुचित वृत्ती भारतात पूर्वी नव्हती,' असे जय वसावडा यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल?
पाटीदार समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरदार पटेल ग्रुपने रविवारी मेहसाणा येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमात बोलताना पटेल यांनी हे विधान केले आहे. "राज्याचे आरोग्यमंत्री रुषिकेश पटेल यांनी मला सांगितले की, मुलींनी लग्नासाठी घरातून पळून जाण्याच्या घटनांचा अभ्यास केला पाहिजे. यासोबतच प्रेमविवाह करताना पालकांची संमती आवश्यक असेल, अशी व्यवस्था करायला हवी. रुषिकेश पटेल यांनी मला प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची शक्यता आहे का हे पाहण्यासाठी अभ्यास करण्यास सांगितले आहे. जर ते घटनात्मकदृष्ट्या शक्य असेल तर आम्ही या संदर्भात अभ्यास करून तसे करण्याचा प्रयत्न करू," असे भूपेंद्र पटेल यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस आमदाराचे समर्थन
"प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्यासाठी अभ्यास केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विधानसभेच्या अधिवेशनात राज्य सरकारने असे विधेयक आणल्यास मी त्याला पाठिंबा देईन," असे काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांनी म्हटलं आहे. प्रेमविवाह करताना पालकांचे दुर्लक्ष होत असताना, सरकार प्रेमविवाहांसाठी विशेष तरतुदी करण्याचा विचार करत आहे, ज्या घटनात्मक असाव्यात, असेही खेडावाला म्हणाले.