नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशात रान पेटलेलं असताना पंतप्रधान मोदींनी गेल्या सहा महिन्यांच्या सरकारच्या कामागिरीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्व मंत्र्यांना आपलं रिपोर्ट कार्ड सादर करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. या बैठकीत प्रत्येक मंत्रालयाने केलेल्या कामगिरीवर चर्चा करण्यात येणार आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा अध्यक्ष अमित शाहदेखील आजच्या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३० मे रोजी ५७ मंत्र्यांसह शपथ घेत आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केली होती. त्यावेळी शपथ घेतलेल्या मंत्र्यांना काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. गेल्या सहा महिन्यात ज्या मंत्र्यांनी चांगलं काम केलं आहे त्यांना प्रमोशन मिळू शकतं. तर ज्या मंत्र्यांचं काम समाधनकारक नाही त्यांना पदावरुन हटवलं जाण्याची शक्यता आहे.
मंत्री आपापल्या खात्याने केलेल्या कामांचं प्रेझेन्टेशनही करणार आहेत. मोदी सरकार दोनच्या गेल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळातील ही दुसरी बैठक आहे. रिपोर्ट कार्डच्या आधारावर मंत्र्यांचं मंत्रिमंडळात भवितव्य ठरणार आहे. त्यामुळे ही बैठक म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीची तयारी मानली जात आहे.