देशातील अनेक श्रीमंत कुटुंब परदेशात लग्न करत असल्याच्या ट्रेंडमुळे आपण फार व्यथित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना भारतातच लग्न करा, जेणेकरुन आपला पैसा परदेशात जाणार नाही असं आवाहनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मधून देशवासियांशी संवाद साधताना लग्नाची खरेदी करताना 'मेड इन इंडिया' वस्तूंनाच प्राधान्य द्या असं आवाहन केलं आहे.
"आता लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाच्या हंगामात तब्बल 5 लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञ दर्शवत आहेत. लग्नासाठी खरेदी करताना तुम्ही सर्वांनी फक्त भारतात तयार केलेल्या वस्तूंनाच प्राधान्य द्यायला हवं," असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं आहे.
"आता लग्नाचा विषय आलाच आहे, तर एका गोष्टीने मला मागील अनेक काळापासून व्यथित केलं आहे. आता जर मी हे दु:ख माझ्या कुटुंबातील सदस्यांसमोर व्यक्त करणार नाही तर मग कोणाकडे करणार? काही श्रीमंत कुटुंबांनी परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंड सुरु केला आहे. याची खरंच गरज आहे का?," अशी विचारणा नरेंद्र मोदींनी केली आहे. यावेळी त्यांनी जर लग्नाचे सर्व कार्यक्रमात आपल्या मायभूमीत झाले तर आपला पैसा देशातच राहील असं म्हटलं. अशा लग्नात देशवासियांना काही ना काही सेवा करण्याची संधी मिळेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
"गरीबही आपल्या मुलांना तुमच्या लग्नांबद्दल सांगतीतल. तुम्ही ही व्होकल टू लोकल मोहीम विस्तारु शकता का? आपण असे लग्नसोहळे आपल्या देशात का आयोजित करु शकत नाही? कदाचित तुम्हाला हवी असणारी एखादी यंत्रणा नसावी अशी शक्यता असू शकते. पण आपण जर सोहळे आयोजित केले तर यंत्रणाही उभी राहील. हा विषय मोठ्या, श्रीमंत कुटुंबांशी संबंधित आहे. माझ्या या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी आशा आहे," असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितलं की, जेव्हा लोक मोठ्या प्रमाणावर राष्ट्र उभारणीची जबाबदारी घेतात तेव्हा जगातील कोणतीही शक्ती त्या देशाला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. आज भारतात हे स्पष्टपणे दिसून येत आहे की देशातील 140 कोटी लोकांच्या नेतृत्वात अनेक परिवर्तन घडत आहेत.
"आपण या सणासुदीच्या काळात याचे थेट उदाहरण पाहिलं आहे. गेल्या महिन्यात 'मन की बात'मध्ये मी 'व्होकल फॉर लोकल' अर्थात स्थानिक उत्पादने खरेदी करण्यावर भर दिला होता. गेल्या काही दिवसांत दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांत देशात 4 लाख कोटींहून अधिकची उलाढाल झाली आहे,” अशी माहिती मोदींनी दिली.