चेन्नई : फेसबुकवर महिलेच्या नावाने फेक अकाऊंट बनवून, प्रेमात पाडणाऱ्या एका तरुणाची, पोलिसानेच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भावनांचा हा खेळ हा मुलाला चांगलाच महागात पडलाय, अखेर त्याचा त्या पोलिसानेच जीव घेतला आहे.
एस अय्यानार याने महिलेच्या नावाने हे फेक अकाऊंट बनवलं होतं, त्याचाच खून कन्न कुमारने केला. कन्नन कुमार हा आरोपी पोलिस आहे, त्याचं वय 32 वर्ष आहे. तर मृत तरुणाचं नाव एस अय्यानार असं आहे. विशेष म्हणजे आरोपी पोलिसाने ३ साथीदारांच्या मदतीने तरुणाची हत्या केली.
फेसबुकवर फ्रेण्डशिप झालेल्या त्या बनावट अकाऊंट असलेल्या मुलीला भेटायला कन्नन गेला होता. यासाठी आरोपी कन्नन कुमारने विरूद्धनगर जिल्ह्यातील त्याच्या गावाला जाण्यासाठी दहा दिवसांची सुट्टी घेतली होती. पण तिथे पोहोचल्यावर त्याला कळलं की, ज्याला तो महिला समजत होता, तो प्रत्यक्षात पुरुष होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फेसबुकवर एस अय्यानारने मुलीच्या नावाने फेक अकाऊंट ओपन केलं होतं. तो कन्ननसोबत मुलीचा आवाज काढून बोलत असे. पण सत्य समोर आल्यावर कन्ननला नैराश्य आलं, यात त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत अय्यानारच्या खूनाचा कट रचला'.
कन्ननचे आरोपी मित्र विजयकुमार, तमिलरासन आणिर तेंजिंग यांना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर मुख्य आरोपी कन्नन मात्र फरार आहे, त्याचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.