नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकुर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज व्यवस्थित सुरू नसल्याचं म्हटलंय. या चौघांनी सरन्यायाधीशांवर आरोप केले आहेत. देशाची लोकशाही धोक्यात आहे. यासंदर्भात आम्ही सरन्यायाधीशांची भेटही घेतली. पण आमचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यामुळेच आम्ही आमचं म्हणणं लोकांसमोर ठेवत आहोत, असं वक्तव्य या चार न्यायमूर्तींनी केलं आहे.
या विषयावर वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपलं मत मांडलं. मी ३५ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज बघतो आहे. पण अशी परिस्थिती पाहीली नव्हती. कोणत्या न्यायमूर्तींनी कोणती केस बघावी हे एखादा न्यायमूर्ती ठरवत असल्याचं मी पाहीलं नव्हतं. आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे ठरवतांना दिसतायेत, असं प्रशांत भूषण म्हणाले.
यात कोणतंही राजकारण नसून हा सरन्यायाधीश आणि चार न्यायमूर्तींमधला वाद आहे. सरन्यायाधीश आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करतायेत. हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. सर्वोच्च न्यायालयाचं स्वातंत्र्य अबाधित राखलं गेलं पाहीजे. यामुळेच या चारही न्यायमूर्तींनी प्रसारमाध्यमांद्वारे हा मुद्दा लोकांसमोर आणला आहे.