'मला हात लावू नका', प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर...; पाहा VIDEO

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूलमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. परीक्षेच्या पेपर लीकशी संबंधित कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.  

शिवराज यादव | Updated: Jul 6, 2024, 03:16 PM IST
'मला हात लावू नका', प्रिन्सिपलला शिक्षकांनीच धक्के देत ऑफिसबाहेर काढलं, मोबाईलही खेचून घेतला अन् अखेर...; पाहा VIDEO  title=

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये चक्क महिला मुख्याध्यापकाला धक्क देत कार्यालयाबाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत संस्थेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या कर्मचाऱ्यांचा एक गट मुख्याध्यापकांच्या कार्यालयात प्रवेश करतो आणि खुर्ची तात्काळ रिकामी करण्यास सांगतात. मुख्याध्यापक मात्र नकार देते. यानंतर तिला प्रतिकार करत जबरदस्तीने बाहेर काढून टाकलं जातं. तिचा फोनदेखील हिसकावून घेतला जातो. त्यानंतर, नवनियुक्त मुख्याध्यापिका तिच्या जागी बसतात. यावेळी उपस्थित टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात.

2 मिनिट 20 सेकंदाचा हा गदारोळ कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. परीक्षेच्या पेपर लीकशी संबंधित कोट्यवधी रुपयांचा कथित घोटाळा हा वादाच्या केंद्रस्थानी आहे.

नेमकं काय झालं आहे?

लखनौच्या डायोसीजचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या बिशप मॉरिस एडगर डॅन यांनी आरोप केला आहे की, 11 फेब्रुवारीच्या UPPSC पुनरावलोकन अधिकारी-सहाय्यक पुनरावलोकन अधिकारी (RO-ARO) पेपर लीकशी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात शाळा अडकली आहे. बिशप डॅन म्हणाले की, पेपर लीक प्रकरणी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने अटक केलेल्यांमध्ये विनीत जसवंत नावाचा स्टाफ सदस्य असून प्राचार्य पारुल सोलोमनचाही सहभाग उघडकीस आला आहे. सोलोमन यांना पदावरुन काढून टाकणं हा घोटाळ्यातील त्यांच्या कथित सहभागाचा थेट परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला.

11 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर फुटला होता. यूपी एसटीएफने बिशप जॉन्सन गर्ल्स स्कूलमधील परीक्षा केंद्र प्रशासक विनीत यशवंत यांच्यासह दहा जणांना अटक केली होती. मोबाईल फोनवर फोटो काढून परीक्षा केंद्रावरून सकाळी साडेसहा वाजता पेपर लीक केल्याचा आरोप आहे. सोलोमन यांच्या कथित गैरवर्तनाचे तीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बिशपसह अनेक लोक मुख्याध्यापकांच्या कार्यालयात घुसून सोलोमन यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यावेळी त्या 'स्पर्श करू नका' अशी विनंती करत होत्या. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात, एक महिला शिक्षिका सोलोमन यांचा फोन जबरदस्तीने घेते. त्यानंतर, इतर कर्मचारी सदस्य सोलोमन यांना बाहेर काढण्यासाठी अडथळा आणणारं मोठं टेबल हटवतत आणि त्यांची खुर्ची ढकलण्यास सुरुवात करतात. अखेरीस, सोलोमन यांना कार्यालयातून काढून टाकण्यात आले आणि नवीन प्राचार्य शर्लिन मॅसी त्यांची जागा घेतात. कर्मचारी यावेळी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करतात. 

गुन्हा दाखल

बिशप डॅन यांच्या माहितीनुसार, सोलोमन यांच्या कार्यकाळानंतर नवीन प्राचार्य म्हणून शर्ली मॅसी यांची नियुक्ती करण्यात आली. तथापि, मॅसी यांच्या आगमनानंतर सोलोमन यांनी स्वतःला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात कोंडून घेतलं. दार जबरदस्तीने उघडल्यावर काही शिक्षकांनी सोलोमन यांना त्य़ांच्या खुर्चीवरून हटवलं. बिशप डॅन यांनी दावा केला आहे की ,  सोलोमन यांनी लैंगिक शोषणासाठी या गटावर गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणताही शारीरिक संपर्क दिसत नसल्याचंही ते म्हणाले आहेत. 

बिशप डॅन यांनी अधिकाऱ्यांना आणखी काही व्हिडीओ दिलले आहेत. पण दुसरीकडे प्राचार्य पारुल सोलोमन यांच्याशी झालेल्या कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सार्वजनिकरित्या प्रसिद्ध झालेले नाहीत.

सोलोमन यांच्या तक्रारीनंतर एनएल डॅन, बिशप मॉरिस एडगर डॅन, विनिता इसुबियस, संजीत लाल, विशाल नवेल सिंग, आरके सिंग, अरुण मोज्स, तरुण व्यास, अभिषेक व्यास आणि इतरांसह अनेक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपींनी पोलिसांकडे व्हिडिओ सादर केला असून, ते सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बिशप डॅन यांनी सोलोमन यांनी प्राचार्यपदाच्या कार्यकाळात शाळेतील 2.40 कोटींची उधळपट्टी केल्याचा आरोप केला आहे.

Tags: