प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारण प्रवेश आणि पाच महत्त्वाचे मुद्दे

प्रियांका गांधी -वाड्रा यांचा बुधवारी औपचारिकपणे काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या पदावर प्रवेश झाला.

Updated: Jan 23, 2019, 03:43 PM IST
प्रियांका गांधी यांचा सक्रिय राजकारण प्रवेश आणि पाच महत्त्वाचे मुद्दे title=

नवी दिल्ली - प्रियांका गांधी -वाड्रा यांचा बुधवारी औपचारिकपणे काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या पदावर प्रवेश झाला. त्यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमधील पूर्व भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाकडे बघताना कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील, याचा लेखाजोखा...

- प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारण आणावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात होती. पण त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. प्रियांका गांधी यांच्यामध्ये माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचीच छबी असल्याचे अनेक जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. आता सक्रिय राजकारणात प्रियांका गांधी यांच्या प्रवेशामुळे या कार्यकर्त्यांमधील उत्साह दुणावला आहे. 

- येत्या एप्रिल-मेमध्ये होणारी लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. काँग्रेसला पन्नाशीचा आकडाही गाठता आला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत कामगिरीत सुधारणा करणे काँग्रेससाठी आवश्यक आहे. त्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियांका गांधी यांनाही सक्रिय राजकारणात आणण्यात आले आहे.

- उत्तर प्रदेश राज्य लोकसभा निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे आहे. या राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत. जो पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकेल, तो पुढील सरकार निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. गेल्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने ८० पैकी ७२ जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता स्थिती बदलली आहे. उत्तर प्रदेशात सप आणि बसप या दोन्ही विरोधकांनी एकमेकांशी हातमिळवणी करीत आघाडी केली आहे. त्यामुळे एकीकडे भाजप आणि दुसरीकडे सप-बसप आघाडी अशी स्थिती आहे. त्यातच काँग्रेसला या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी एखादी मोठा निर्णय घेण्याची गरज होतीच. म्हणूनच प्रियांका गांधी यांना राजकारणात आणून त्यांच्याकडे उत्तर प्रदेश पूर्व भागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

- राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर होणारी ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांमधील भावा-बहिणीचे नाते एकदम घट्ट असून दोघांचा एकमेकांना फायदा होऊ शकतो. प्रियांका गांधींमुळे उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधींना फारसे लक्ष न देता त्यांना देशातील इतर भागांमध्ये प्रचार करता येऊ शकतो, अशीही काँग्रेसची रणनिती असू शकते.  

- प्रियांका गांधी यांची प्रतिमा आणि त्यांचा सहज वावर हा काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर पुढील निवडणूक पक्षाने किती गंभीरपणे घेतली आहे, असाही संदेश या माध्यमातून काँग्रेस पक्षश्रेष्ठींना द्यायचा असेल. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन भाजपशासित राज्यातील सत्ता काँग्रेसने काबीज केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात आल्यामुळे कार्यकर्त्यांमधील विश्वास वाढण्यास मदत होईल.