IIT-BHU च्या विद्यार्थिनीला नग्न केलं अन् नंतर कोपऱ्यात नेऊन...; विद्यार्थ्यांचा आक्रोश

विद्यार्थिनी आपल्या मित्रासह भल्या पहाटे बाहेर गेलेली असताना ही घटना घडली. बाईकवरुन जाणाऱ्या तिघांनी तिला थांबवलं आणि यानंतर त्यांनी छेड काढली अशी माहिती विद्यार्थिनीने तक्रारीत दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 2, 2023, 07:08 PM IST
IIT-BHU च्या विद्यार्थिनीला नग्न केलं अन् नंतर कोपऱ्यात नेऊन...; विद्यार्थ्यांचा आक्रोश  title=

वाराणसीमध्ये आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीची कॅम्पसमध्येच दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आक्रोश असून आंदोलन सुरु केलं आहे. विद्यार्थिनी आपल्या मित्रासह पहाटे बाहेर गेली असता हा प्रकार घडला. विद्यार्थिनीने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपी तिला तिच्या मित्रापासून वेगळं करत एका कोपऱ्यात घेऊन गेले. यानंतर त्यांनी तिचे कपडे काढले आणि नंतर फोटो, व्हिडीओ काढले. 

पीडित विद्यार्थिनीने तक्रारीत सांगितल्यानुसार, आरोपींनी 15 मिनिटांनी तिची सुटका केली. यावेळी त्यांनी तिचा फोन नंबरही घेतला. विद्यार्थिनीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी कलम 354 अंतर्गत (विनयशीलतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने महिलेवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरी) गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. कॅम्पसमधील विद्यार्थी सेंटरमध्ये सगळेजण जमले आणि आंदोलनास सुरुवात केली. या घटनेत बाहेरील काही घटकांचा समावेश असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. यासह त्यांनी बाहेरील लोकांना कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी केली आहे. 

"आरोपींचा शोध सुरू असून, काही विद्यार्थी त्यांच्या आयआयटी कॅम्पसच्या सीमा वेगळ्या कराव्यात अशी मागणी करत आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे नीट चालावेत आणि वीजपुरवठा सुरळीत असावा यासाठीही निवेदन दिलं आहे," अशी माहिती डीसीपी आरएस गौतम यांनी दिली आहे. या घटनेची तपासणी करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्हीचा आधार घेत आहेत. 

दरम्यान पोलिसांनी सोशल मीडिया युजर्सनाही इशारा दिला आहे. जर पीडित विद्यार्थिनीचा व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.