Qatar Court Sentence Death Penalty: कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. गतवर्षी कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 नौदल अधिकाऱ्यांना कोर्टाने मृत्यूदंड ठोठावला होता. कोर्टाच्या या निर्णयावर भारताने आश्चर्य व्यक्त केलं होतं. भारतीय नौदलाचे हे सर्व आठ माजी अधिकारी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून कतारमधील जेलमध्ये बंद आहे. कतारने अद्याप या सर्व माजी अधिकाऱ्यांविरोधात लावण्यात आलेल्या आरोपांची माहिती दिलेली नाही. या सर्वांवर हेरगिरीचा आरोप आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, "कतारच्या अपील न्यायालयाने दाहरा ग्लोबल प्रकरणात शिक्षा कमी केली आहे. न्यायालयाच्या संपूर्ण निकालाची प्रत मिळण्यासाठी आम्ही प्रतिक्षा करत आहोत. याशिवाय आपलं पुढील पाऊल काय असेल यासंबधी निर्णय घेण्यासाठी आम्ही कायदेशीर टीमसह कुटुंबातील सदस्यांच्याही संपर्कात आहोत".
निवेदनात पुढे सांगण्यात आलं आहे की, "कतार कोर्ट ऑफ अपीलने आज आमचे राजदूत आणि अन्य अधिकाऱ्यांसह शिक्षा ठोठावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय होते. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून आम्ही त्यांच्या पाठीशी असून, यापुढेही काऊंसलर आणि कायदेशीर मदत देत राहू. यासह कतारच्या अधिकाऱ्यांसमोरही हा मुद्दा सक्षमपणे मांडत राहू. प्रकरणाचं गांभीर्य आणि गोपनीयता पाहता यावेळी त्यावर जास्त भाष्य करणं योग्य ठरणार नाही".
"We have noted the verdict today of the Court of Appeal of Qatar in the Dahra Global case, in which the sentences have been reduced...The detailed judgement is awaited....Our Ambassador to Qatar and other officials were present in the Court of Appeal today, along with the family… pic.twitter.com/ysjVhbisaK
— ANI (@ANI) December 28, 2023
हे सर्व अधिकारी एका खासगी कंपनीत काम करत होते. ही कंपनी कतारी एमिरी नौदलाला प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते. रिपोर्टनुसार, कंपनीचं नाव दहरा ग्लोबल टेक्नोलॉजी आणि कन्सल्टन्सीज सर्विहस आहे. कंपनी स्वतःला कतार संरक्षण, सुरक्षा आणि इतर सरकारी संस्थांचे स्थानिक भागीदार असल्याचं सांगते. रॉयल ओमान हवाई दलाचे निवृत्त स्क्वॉड्रन लीडर खामिस अल अजमी या कंपनीचे सीईओ आहेत.
कतार पोलिसांनी अटक केलेल्या 8 माजी नौसैनिकांमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेते कमांडर पूर्णांदू तिवारी (आर) यांचाही समावेश आहे. 2019 मध्ये त्यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, पूर्णांदू तिवारी यांनी भारतीय नौदलात अनेक मोठ्या जहाजांचे नेतृत्व केलं आहे.