नवी दिल्ली : प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे. यामुळे कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रियांका गांधी यांच्याना पक्षाचे महासचिव बनवून पूर्वेकडील उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. पण प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशावर शिकामोर्तब हे साता समुद्रापार झाले याबद्दल तुम्हाला माहित आहे का ? हो. प्रियांका यांच्या राजकीय प्रवेशाची पटकथा अमेरिकेतून ठरली. नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे दुबई दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी मिशन लोकसभा निवडणूक अंतर्गत ते थेट अमेरिकेत पोहोचले. जिथे प्रियांका गांधी आधीपासूनच उपस्थित होत्या. इथेच या राजकीय प्रवेशावर शिकामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रियांका गांधी आपल्या मुलाच्या तब्बेतीची पाहणी करण्यासाठी अमेरिकेला गेल्या आहेत. त्या 2 फेब्रुवारीनंतर भारतात परततील.
प्रियांका गांधी यांना मनवण्यासाठी राहुल हे दुबई वरून थेट अमेरिकेत गेले. राजकारणात प्रवेश करण्याची योग्य वेळ आल्याचे राहुल यांनी प्रियांका यांना पटवून दिले. प्रियांका यांना सध्या राजकारणात यायचे नव्हते. त्या पडद्यामागून भूमिका बजावत होत्या. आतापर्यंत त्यांनी राहुल आणि सोनिया गांधींसाठी अमेठी आणि रायबरेली येथून निवडणूकीदरम्यान रोड शो आणि रॅली केल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांत प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेशाचा निर्णय घेतला होता पण वेळ नक्की नव्हता. उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश यादव यांची पार्टी बसपा-सपासोबत कॉंग्रेसची युती होणार नाही हे स्पष्ट झाल्यावर राहुल गांधी यांनी 'प्रियांका कार्ड' खेळण्याची रणनिती आखली. या कारणामुळे राहुल गांधी दुबईहून थेट अमेरिकेत पोहोचले. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. जर उत्तर प्रदेशमध्ये मायावती आणि अखिलेश हे कॉंग्रेसच्या सोबत असते तर प्रियांका प्रवेश झाला नसता किंवा वेगळ्या प्रकारे झाला असता असे कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
प्रियांका गांधी यांच्या राजकीय प्रवेशामुळे कॉंग्रेस वर्किंग कमेटीमध्ये गांधी घराण्याचे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी असे तीन जण झाले आहेत. प्रियांका या नेमक्या कुठून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियांका आपल्या आईचा पारंपारिक मतदार संघ असलेल्या रायबेली येथून निवडणूक लढवू शकतात.