नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केलाय. नोटबंदीवरुन हा निशाणा साधलाय. मी पंतप्रधान असतो तर नोटबंदीची फाईल कचऱ्याच्या डब्यात टाकली असती, असे प्रतिपादन राहुल यांनी केले.
राहुल गांधी सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा हा दौरा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चांगलाच गाजत आहे. शनिवारी राहुल गांधी यांनी मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचे वाभाडे काढले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
राहुल म्हणालेत, मी पंतप्रधान असतो आणि कोणी माझ्याकडे नोटाबंदीच्या निर्णयाची फाईल सोपवली असती तर मी ती कचराकुंडीमध्ये फेकून दिली असती किंवा त्या व्यक्तीला फाईलसह कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवला असता. कारण मला असे वाटते की, नोटबंदीच्या निर्णयाची तीच जागा योग्य आहे.
Congress President Rahul Gandhi tells us how he would have rolled out #Demonetisation better. #RGinMalaysia pic.twitter.com/2Tm82a8fjU
— Congress (@INCIndia) March 10, 2018
पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षापूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर नवीन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, अधिकच गोंधळ उडाल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आलाय.