नवी दिल्ली: इटलीहून भारतात परतल्यानंतर राहुल गांधी यांची दिल्ली विमानतळावर त्यांची कोरोना टेस्ट झाली, असे काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भाजप खासदार रमेश बिदुरी यांनी गुरुवारी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. इटलीहून परतल्यानंतर राहुल गांधी यांनी दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा केला होता. मात्र, त्यापूर्वी राहुल यांनी कोरोनाची तपासणी केली होती का, असा सवाल बिदुरी यांनी उपस्थित केला होता.
दिल्ली विमानतळावर त्यांची तपासणी झाली का, याबाबत मला निश्चित माहिती नाही. मात्र, इटलीहून परतल्यानंतर त्यांची तपासणी होणे, अपेक्षित होते. त्यांनी करोनाचा प्रादुर्भाव करणे योग्य नाही, असे बिदुरी यांनी म्हटले होते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधी यांची कोरोना टेस्ट झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. राहुल गांधी हे २९ फेब्रुवारीला इटलीहून भारतात दाखल झाले. यावेळी दिल्ली विमानतळावर राहुल गांधी यांनी कोरोनाची तपासणी केली, असं काँग्रेसकडून सांगण्यात आले.
इटलीमध्ये कोरोनाचे २५०० रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत इटलीत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. राहुल गांधी इटलीच्या मिलानमध्ये गेले होते. भारतात परततेवेळी दिल्ली विमानतळावर त्यांनी इतर प्रवाशांप्रमाणे रांगेत उभे राहून कोरोनाची तपासणी केली. आपले सुरक्षारक्षक आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही त्यांनी तपासणीत सहकार्य करण्याच्या सूचना केल्या होत्या, असे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा होली मिलन कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे टाळावे, असा सल्ला अनेक तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले होते.