Delhi Sakshi Ahuja Death: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station) प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका आईला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, 35 वर्षीय साक्षी अहुजा यांच्या मृत्यूमुळे फक्त दिल्ली नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. दोन मुलांची आई असणारी साक्षी शिक्षिका होती. तसंच ती संपूर्ण कुटुंबही सांभाळत होती. पण रविवारी ट्रेन पकडण्यासाठी त्या दिल्ली रेल्वे स्थानकावर गेल्या आणि आपला जीव गमावला. साक्षी यांच्या जाण्याने त्यांच्या दोन लहान मुलांसह कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साक्षी यांना मृत्यूच्या वेळीही आपल्या मुलांचीच काळजी होती. विजेचा धक्का लागल्यानंतर त्या मुलांना बाजूला न्या असं ओरडत होत्या.
साक्षी यांना 7 आणि 9 वर्षांची दोन मुलं आहेत. रविवारी सकाळी वंदे भारत एक्स्प्रेस पकडण्यासाठी त्या आपल्या मुलासंह सकाळी 5.30 वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्या दिवशी रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. त्यामुळे पार्किंगमध्ये पाणी भरलेलं होतं. साक्षी आपल्या मुलांसह पहाडगंजच्या दिशेला गेट नंबर 2 च्या येथील पार्किंगमधून स्टेशनला जात होत्या. त्याचवेळी साक्षी यांचा पाय घसरला आणि त्यांनी तोल सावरण्यासाठी जवळ असणारा खांब पकडला. पण वीजेच्या तारा उघड्या असल्याने खांबातून करंट वाहत होता. यामुळे साक्षी यांना विजेचा धक्का बसला.
दरम्यान, विजेचा धक्का बसल्याने साक्षी तडपडत असताना यावेळीही त्यांना मुलांची काळजी होती. त्या परिस्थितीतही त्यां मुलांना तेथून दूर करा म्हणून ओरडत होत्या. या ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे अनेकजण हादरले आहेत.
जेव्हापासून शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या, तेव्हापासून मुलं फिरायला जाण्याचा हट्ट करत होती. आईने चंदिगडला जाण्यासाठी वंदे भारतचं तिकीट बूक केलं असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण याच प्रवासामुळे आपण आपली आई गमावणार असल्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
विजेचा धक्का लागल्याने साक्षीला आपला जीव गमवावा लागला. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दोन लहान मुलांच्या डोक्यावरचं छप्पर गेलं आहे.
साक्षी यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, दोन्ही मुलं वंदे भारतने प्रवास करणार असल्याने आनंदी होती. त्यांनी वंदे भारतबद्दल बरंच काही ऐकलं आणि वाचलं होतं. साक्षी प्रथम कारने जाणार होत्या. पण नंतर त्यांनी ट्रेनचं तिकीट बूक केलं होतं.
स्टेशनच्या बाहेर पावसाचं पाणी भरलं होतं असं कुटुंबियाचं म्हणणं आहे. आपण दिल्लीला स्मार्ट सिटी म्हणतो, पण सुविधा कुठे आहेत? अशी विचारणा त्यांनी केली आहे. दरम्यान रेल्वेचं म्हणणं आहे की, इंसुलेशनमुळे करंट खांब्यात उतरला होता. घटनास्थळावरील फोटोंमध्ये मात्र उघड्या तारा पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता नेमकं दोषी कोण हा प्रश्न महत्त्वाचा असून त्याचं उत्तर मिळणं गरजेचं आहे.