मुंबई : यंदाच्या वर्षांतील आज शेवटचे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारत, सौदी अरेबिया, कतार, मलेशिया,ओमान, सिंगापूर, श्रीलंका, मरिना बेटे व बोरनिओ येथून सूर्यग्रहण दिसेल. यात ‘रिंग ऑफ फायर’चे विलोभनीय दृश्य पाहण्याची संधी मिळणार आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण दिसणार असून ते कंकणाकृती असेल. सूर्याकडे थेट उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक आहे त्यामुळे योग्य काळजी घेऊनच ग्रहण पहावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
आज होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणामुळे शिर्डीचं साईबाबा समाधीमंदिराच्या कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. सकाळी ८ ते सकाळी ११ दरम्यान साई मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिरात मंत्रोपचाराने पठण केलं जाणार आहे. तसंच साईंना पांढऱ्या रंगाची शाल घालून समाधीला तुळशीपंत्रांचं आच्छादन घालण्यात येणार आहे. ग्रहण कालावधीसंपल्यानंतर मूर्तीला मंगलस्नान घालण्यात येईल त्यानंतर साईची आरती करण्यात येणार आहे. रोज १२ वाजता होणार मध्यान्ह आरती आज दुपारी १२.३० वाजता होणार असल्याची माहिती साई मंदिराचे पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी दिली आहे. (गुरुवारी पाहता येणार कंकणाकृती सूर्यग्रहण)
तसेच सूर्यग्रहणामुळे तिरुपती मंदिराचे दरवाजे १३ तासांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. काल रात्री ११ वाजेपासून आज दुपारी १२ वाजेर्यंत तिरुपती मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्यात आले आहे. सकाळी ८ वाजून ८ मिनिटांपासून सकाळी ११ वाजून १ मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण पाहता येणार आहे. प्रत्येक ग्रहणाआधी ६ तास आधीपासून तिरुपती मंदिर बंद करण्याची परंपरा आहे. ग्रहणशुद्धीनंतर दुपारी अडीच नंतर भाविकांना दर्शन आणि प्रसाद मिळू शकणार आहे. यंदा दुसऱ्यांदा मंदिराचे दरवाजे ग्रहणामुळे बंद ठेवण्यात येणार आहेत. ख्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे सध्या तिरुपती देवस्थानच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. मात्र मंदिर १३ तासांसाठी बंद असणार आहे. मात्र सामान्य भाविकांना दर्शनासाठी ताटकळत रहायला लागू नये यासाठी काही काळ व्हीआयपी दर्शन रांग बंद ठेवण्यात येणार आहेत.