मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत बोलवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. उद्धव यांच्यासोबत सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हेदेखील या बैठकीसाठी दिल्लीत जाणार असल्याचे समजते.
शिवसेना हा एनडीएमधील महत्त्वाच्या घटकपक्षांपैकी एक आहे. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत आल्याने त्यांच्याकडून शिवसेनेसारख्या मित्रपक्षांकडे दुर्लक्ष झाले होते. यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव टोकाला पोहोचला होता. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेट घेतल्याने दोन्ही पक्षांमध्ये समेट घडून आला होता.
नुकत्याच समोर आलेली एक्झिट पोलची आकडेवारी पाहता युतीमुळे शिवसेना आणि भाजप दोघांचा फायदा झालेला दिसत आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी प्रत्येकी १७ जागांवर शिवसेना आणि भाजप विजयी होतील, असा अंदाज एबीपी-नेल्सन या एक्झिट पोलने वर्तवला आहे.
Delhi: Shiv Sena Chief Uddhav Thackeray to attend dinner hosted by Amit Shah for NDA leaders today (file pics) pic.twitter.com/Kj3zzrbPJp
— ANI (@ANI) May 21, 2019
दरम्यान, अमित शहा यांनी बोलावलेल्या 'एनडीए'च्या बैठकीनंतर रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या भोजनात उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास 'पुरणपोळी'चा मेन्यू ठेवण्यात आला आहे. यावेळी निकाल जाहीर झाल्यानंतरच्या रणनितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्यासह 'एनडीए'चे अनेक महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत अनौपचारिक बैठक बोलावलीय. ही बैठक म्हणजे मंत्र्यांचा निरोप समारंभ असल्याचे सांगितले जाते.