नवी दिल्ली : दिल्लीच्या दक्षिण पश्चिमी भागात कापसहेडा परिसरातील एकाच इमारतीमधील ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. १८ एप्रिल रोजी या इमारतीमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर संपूर्ण इमारतीला सील करण्यात आलं होतं.
यानंतर इमारतीमधील सगळया लोकांची चाचणी करण्यात आली. या चाचणीत धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
हरियाणाच्या जवळपासचा हा भाग असून दाटीवाटीचा परिसर आहे. या इमारतीत एकूण १७५ घरं आहेत. त्यापैकी ४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
१८ एप्रिल रोजी या इमारतीमध्ये एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर तात्काळ काही महत्वाची पावलं उचलण्यात आली. हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे लागण होण्याची शक्यता दाट होती. आणि तसंच घडलं आहे.
गेल्या २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे (Coronavirus) २२९३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात नोंदवल्या गेलेल्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी साधारण १५०० ते १९०० च्या दरम्यान रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता पहिल्यांदाच हा आकडा २००० च्या पुढे गेला आहे. भारताच्यादृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत १२१८ जणांचा मृत्यू झाला आहे. ३० एप्रिल ते १५ मे हा कालावधी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला (पिक पॉईंट) पोहोचेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी वर्तवला आहे. गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अचानक झालेली वाढ पाहता, हा इशारा खरा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.