नवी दिल्ली: अमेठी मतदारसंघातील स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला होता. यामध्ये स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करण्याचा पराक्रम करून दाखवला होता. यानंतर काहीवेळातच स्मृती इराणी यांच्या प्रचारात अग्रस्थानी असणाऱ्या सुरेंद्र सिंह यांची हत्या झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुरेंद्र सिंह यांच्या बरोलिया येथील निवासस्थानी शुक्रवारी रात्री त्यांची हत्या करण्यात आली. दोन अज्ञात हल्लेखोर सुरेंद्र सिंह यांच्या घरात शिरले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर जखमी अवस्थेतील सुरेंद्र सिंह यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच सुरेंद्र सिंह यांचा मृत्यू झाल होता.
सुरेंद्र सिंह हे बरोलियाचे माजी सरपंच होते. यंदाच्या निवडणुकीत अमेठीत स्मृती इराणी यांच्या प्रचारात त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. राहुल गांधी यांच्या पराभवासाठी अमेठीत स्मृती इराणी यांच्याकडून नियोजनबद्ध प्रचार करण्यात आला होता. यासाठी भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली होती. यामुळेच बरोलिया आणि आजबाजूच्या परिसरातून स्मृती इराणी यांना मोठ्याप्रमाणावर मतदान झाले होते. त्यामुळे ही राजकीय हत्या असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मात्र, पोलिसांकडून अजूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव होणे, ही काँग्रेसच्यादृष्टीने मोठी नामुष्कीची परिस्थिती आहे. स्मृती इराणी यांच्या विजयाने अमेठी मतदारसंघातील गांधी घराण्याचे वर्चस्व अनेक दशकांचे वर्चस्व मोडीत निघाले आहे. या कामगिरीमुळे स्मृती इराणी यांचे भाजपमधील वजन वाढले आहे. त्यामुळे त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान मिळण्याचीही शक्यताही व्यक्त केली जात आहे.