Auto News : तुमचं वाहन किती सुरक्षित आहे? कधी विचार केलाय? फक्त नियमित सर्व्हिसिंग करूनच वाहन सुरक्षित ठेवता येतं असं नाही. तर, त्याचे इतरही काही निकष आहेतच. वाहनांची हीच सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवत केंद्र शासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारच्या मते वाहन जितकं सुरक्षित तितकंच त्यासाठी भरावं लागणारं प्रिमियमही कमी.
तुमच्या वाहनाला आणखी उत्तम आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारनं एक निर्णय घेतला आहे. ज्याअंतर्गत वाहन जितकं सुरक्षित असेल तितकाच कमी प्रिमियम त्यांना भारावा लागणार आहे. यामध्ये स्टार रेटिंग (Star Rating) वाहनांना इंश्योरन्स प्रीमियममध्ये (Insurance Premium) सवलत मिळणार आहे.
भारत एनसीएपी (BharatNCAP) मध्ये पाच स्टार असणाऱ्या वाहनांना सर्वाधिक सवलत दिली जाणार आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाकडून यासंदर्भातील प्रस्तावावर विचार सुरु असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (BharatNCAP) लॉन्च केला होता.
या उपक्रमाअंतर्गत 3.5 टन पर्यंतच्या वाहनांच्या रस्ते सुरक्षा मानकांवर सुधारणा केल्या जाण्याच्या मुद्द्याला अधोरेखित करण्यात आला होता. उच्चस्तरिय सुरक्षा प्रणालीमुळं भारतीय वाहनांना जागतिक स्तरावर इतर वाहनांना टक्क देणं सहज शक्य होणार आहे. यामुळं भारतीय कार उत्पादकांच्या निर्यात क्षमतेतही वाढ होणार आहे.
Bharat NCAP ही केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या वतीनं सुरु करण्यात आलेला एक संरक्षणात्मक उपक्रम आहे. ज्याअंतर्गत 3.5 टनहून कमी वजन असणाऱ्या वाहनांचं संरक्षण निकषांच्या आधारे मूल्यांकन करणं हा मुख्य हेतू केंद्रस्थानी ठेवला जाणार आहे. Bharat NCAP अंतर्गत फ्रंट आणि साईड क्रॅश अशा 2 प्रकारच्या कार क्रॅश टेस्ट केल्या जाणार आहेत.