मुंबई : नोकरी गेल्यानंतर अनेक लोकं तणावाखाली जातात आणि हिंमत गमावतात. पण ही एक अशा व्यक्तीची गोष्ट आहे ज्याने नोकरी गमावल्यानंतर आपल्या मनाचं ऐकलं आणि आज एक मोठे उद्योगपती आहेत.आज त्यांची वार्षिक उलाढाल 8 कोटी रुपये ईतकी आहे. दिल्लीत राहणाऱ्या सुनील वशिष्ठची यांची ही गोष्ट आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सुनील यांना फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेता आलं. याआधी सुनील पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचे. पण एके दिवशी अचानक त्यांची नोकरी गेली. यानंतर सुनील यांनी मन वळवलं आणि अनुभवाच्या जोरावर फ्लाइंग केक्स नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. आज अनेक राज्यातील लोक फ्लाइंग केक्स आउटलेटवर बनवलेल्या केकचा आनंद घेत आहेत.
दहावीनंतर सोडावं लागलं शिक्षण
सुनील यांनी फक्त दहावीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले की, आता आयुष्य स्वबळावर जगा आणि यश मिळवा. यानंतर त्यांच्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी सुनील यांच्यावर पडली. त्यांना कधी कुरिअर डिलिव्हरी बॉय तर कधी पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करावं लागलं. सुनील सांगतात की, 1991 मध्ये त्यांनी दिल्लीतील डीएमएसच्या बूथवर दुध पिशव्या वाटण्याचं पार्टटाईम काम केलं. या कामासाठी त्यांना महिन्याला 200 रुपये पगार मिळत होता.
नोकरीबरोबर शिक्षण सुरू ठेवलं
काही दिवस काम केल्यानंतर सुनील यांनी पुढे शिक्षण घेण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण अभ्यासासोबतच त्यांना नोकरीही करायची होती. सुनील ब्लू डॉट कॉम कंपनीत कुरिअर वितरणाचं काम करू लागले. यातून त्यांना थोडेफार पैसेही मिळू लागले. जसे त्यांना पैसे मिळू लागले तसे त्यांचा शिक्षणातील रसही निघून गेला. दुसऱ्या वर्षाला येईपर्यंत त्यांनी शिक्षण सोडलं. कुरिअर कंपनीत अडीच वर्षे काम केलं. त्यानंतर कंपनी बंद पडली आणि ते बेरोजगार झाले.
यानंतर बनले पिझ्झा डिलीव्हरी बॉय
1997 मध्ये, नोकरीच्या शोधात भटकत असलेल्या सुनील यांना कळालं की, डोमिनोज नावाच्या एका विदेशी कंपनीने दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात आपलं पहिले आउटलेट उघडलं आहे. तिथे काम करण्यासाठी 12वी पास, ड्रायव्हिंग लायसन्स धारक आणि इंग्रजी बोलू शकणारे मुलं हवी आहेत. सुनील यांनी इंटरव्हूव दिला. त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे ते सलग दोनदा नापास झाले. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. यावेळी इंटरव्हूव घेणाऱ्याने सुनिल यांना सांगितलं की, तुला दोनदा नापास केलं आहे. मग तरीही तु पुन्हा पुन्हा का येतोस? यावर सुनील यांनी उत्तर दिलं की सर तुम्ही एक संधी द्या आणि बघा. मी पण इंग्रजी शिकेन. यानंतर सुनील यांना डॉमिनोजमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय ही नोकरी मिळाली.
पत्नीच्या डिलीवरीच्या वेळी सुट्टी मिळाली नाही
सुनील यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काम खूप मेहनतीने केलं. त्यामुळे त्यांना प्रमोशनही मिळालं. 2020 मध्ये त्याचं लग्नही झालं. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मग एके दिवशी जेव्हा त्यांची पत्नी गरोदर होती आणि तिची डिलीव्हरी होणार होती तेव्हा कंपनीने त्यांना सुट्टी दिली नाही. यानंतर ज्युनियरकडे काम सोपवून ते निघून गेल्यावर वरिष्ठांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकलं.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं
नोकरी सोडल्यानंतर सुनील यांचं आयुष्यच बदलून गेलं. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी आपलं काम चांगलं करणं मानलं. यानंतर सुनील यांनी जेएनयूसमोर फूड स्टॉल लावायला सुरुवात केली. काही दिवसांनी त्या रस्त्यावरील एमसीडी लोकांनी तो बेकायदेशीर म्हणून तोडला. मग कुठलंही काम रस्त्याच्या कडेला असलेल्या कोणत्याही बेकायदेशीर जागे ऐवजी कायदेशीर ठिकाणी करावं, हे त्यांना समजलं. दरम्यान, सुनील यांना कळलं की आजकाल नोएडामध्ये कॉल सेंटर उद्योग भरभराटीला येत आहे. अशा अनेक एमएनसी देखील आहेत जे त्यांच्या कर्मचार्यांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करतात आणि केक, पिझ्झा इत्यादी ऑर्डर करतात.
मित्राकडून पैसे घेऊन दुकान उघडलं
सुनील यांनी नोएडामध्ये केक शॉप उघडण्याची संधी सोडली नाही आणि 2007 मध्ये मित्राकडून पैसे उधार घेऊन नोएडाच्या शॉप्रिक्स मॉलमध्ये दुकान थाटलं. फ्लाइंग केक्स असं या दुकानाचं नाव आहे. त्यांनी बनवलेले ताजे केक लोकांना आवडू लागले आणि लवकरच त्यांच्या केकची मागणी वाढू लागली. त्यानंतर सुनील यांना छोट्या खासगी कंपन्यांकडून केकची ऑर्डर मिळू लागली आणि काम सुरू झालं. आज फ्लाइंग केक्सच्या अनेक फ्रँचायझी आणि आउटलेट उघडल्या आहेत आणि आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 80 कोटींहून अधिक आहे.