कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विजयाची हॅटट्रिक करणाऱ्या ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. अटीतटीच्या लढतीत भाजपच्या शुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना 1622 मतांनी पराभवाची धूळ चारली आहे. अखेरच्या फेरीपर्यंत ममता बॅनर्जी पिछाडीवर होत्या. शेवटच्या फेरीत त्या आघाडीवर गेल्या. मात्र फेरमोजणीमध्ये ममतांचा पराभव झाला आहे. निकालानंतर प्रतिक्रिया देताना या निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे. (Mamata Banerjee loses to Suvendu Adhikari)
नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगालमध्ये TMC 200 पेक्षा जास्त जागा जिंकत असल्याचे दिसत आहे. परंतु या प्रचंड बहुमतानंतरही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांची जागा वाचवता आली नाही. सुवेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये विजय मिळवला आहे. ममता बॅनर्जी यांनीही नंदीग्राममधील आपला पराभव स्वीकारला आहे. त्या म्हणाल्या की, 'नंदीग्रामच्या निकालाची कोणतीही चिंता नाही. बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला आहे.'
ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये आपला पराभव मान्य केला. पण टीएमसी फेरमतमोजणीची मागणी करीत आहे. एकेकाळी ममतांच्या अगदी जवळ असलेले सुवेंदू अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने थेट ममता बॅनर्जी यांच्या विरोधात त्यांना मैदानात उतरवलं होतं.