बिहार : कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान अजूनही देशात अनेकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही तर दुसरीकडे बिहारमध्ये एका व्यक्तीने एक दोन नव्हे तर 11 वेळा कोरोनाची लस घेतली आहे.
मधेपुरा जिल्ह्यातील 84 वर्षीय ब्रह्मदेव मंडल यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 11 वेळा कोरोनाची लस घेतली आहे. दरम्यान याचा खूप फायदा झाल्याचंही या व्यक्तीने सांगितलं आहे. लस घेतल्यानंतर त्याच्या गुडघ्याचा त्रास कमी झाला आहे. यामुळे त्याने लसीचा इतके जास्त डोस घेतले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लसीचा 12वा डोस घेण्यासाठी हा व्यक्ती चौसा केंद्रात गेला होता. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्याला ओळखलं. नंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
हा व्यक्ती मोबाईल नंबर बदलून ते लस घेत होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ब्रह्मदेव मंडल हे टपाल विभागातील निवृत्त कर्मचारी आहेत. दरम्यान सिव्हिल सर्जन डॉ. अमरेंद्र नारायण शाही यांनी सांगितलं की, वारंवार ओळखपत्र बदलून लस घेणं हे नियमाविरुद्ध आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
दरम्यान ब्रह्मदेव मंडल याने प्रत्येक डोसची तारीख, ठिकाण आणि वेळ याची नोंद करून ठेवली आहे.