काश्मीरच्या गुलमर्ग-पहलगाम येथे हंगामातील पहिली बर्फवृष्टी

काश्मीरमध्ये हंगामाच्या पहिल्या हिमवृष्टीने पर्यटन व्यवसायात नवीन उत्साह भरला आहे.

Updated: Nov 15, 2020, 09:31 AM IST
काश्मीरच्या गुलमर्ग-पहलगाम येथे हंगामातील पहिली बर्फवृष्टी title=

श्रीनगर : काश्मीरमध्ये हंगामाच्या पहिल्या हिमवृष्टीने पर्यटन व्यवसायात नवीन उत्साह भरला आहे. काश्मीरमधील हिलस्टेशन गुलमर्ग-पहलगाम येथे झालेल्या हिमवृष्टीमुळे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनामुळे मंदावलेला पर्यटन उद्योगाला पुन्हा उभारी मिळेल अशी आशा आहे.

हिमवृष्टीमुळे गुलमर्गवर पांढरी चादर झाकली गेली आहे. देश-विदेशातील शेकडो पर्यटकही येथे फिरायला येतात. येथे आल्यावर स्वर्गात आल्याची भावना पर्यटकांमध्ये असते. हिमवृष्टीमुळे पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. मार्चपासून पर्यटन व्यवसाय बंद होता. कोरोनामुळे लोकांना येथे येणं जमत नव्हतं. हिमवृष्टीमुळे पर्यटक पुन्हा काश्मीरला येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्याच्या वरच्या भागात या हंगामाची ही पहिली बर्फवृष्टी आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस हिमवर्षाव आणि पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्याचबरोबर, पर्यटन विभागाला गुलमर्ग आणि पहलगाम सारख्या हिलस्टेशन्सवर बर्फवृष्टी होण्याची जास्त आशा आहे.

दरम्यान, खराब हवामानामुळे जिल्हा प्रशासनाने श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद केला आहे. तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवस हिमवृष्टी व पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. काश्मिरात थंडी वाढल्याने सामान्य लोकांना थोडा त्रास होईल, पण यामुळे काश्मीरमधील पर्यटन सुधारण्याची आशा आहे.