नवी दिल्ली: राजद्रोह हा ब्रिटीशांच्या काळातील कायदा असून आजच्या काळात त्याची आवश्यकता उरलेली नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. अनेकदा सरकारविरोधात बोलणाऱ्या किंवा ट्विट करणाऱ्यांवरही राजद्रोहाचा आरोप लावला जातो. या कायद्याचा गैरवापर करून नागरिकांवर पाळत ठेवली जाते, असे सिब्बल यांनी म्हटले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) कथित देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणी अखेर तीन वर्षांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थी संघटनेचा तत्कालिन अध्यक्ष कन्हैया कुमार, तेथील विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले.
Kapil Sibal, Senior Congress leader: There is no need for a sedition law in today's times, it is a colonial law. Many who merely speak or tweet against the Government have sedition charges imposed against them, it is being misused by Centre just to keep citizens in check pic.twitter.com/27Lmun5y8g
— ANI (@ANI) January 16, 2019
९ फेब्रुवारी २०१६ ला दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये सामील असणाऱ्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केली होती. जेएनयूच्या विद्यार्थी परिषदेचा तत्कालिन अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह काही काश्मिरी तरुणांना आरोपी ठरविण्यात आले होते. घटनेच्या दोन दिवसांनंतर म्हणजेच ११ फेब्रुवारी २०१६ ला या प्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याप्रकरणी कन्हैया कुमारसह दुसऱ्या आरोपींना अटकही झाली होती. आता तीन वर्षांनंतर दिल्ली पोलीस या प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात घटनेच्या वेळची दृश्ये, मोबाईलमधील दृश्ये, त्यासंदर्भातील फेसबुक पोस्ट, घटनास्थळी उपस्थित जेएनयू प्रशासनातील लोक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी, विद्यापीठाचे सुरक्षारक्षक आणि उपस्थित विद्यार्थी यांच्याकडे केलेल्या चौकशीच्या आधारे आरोपपत्र तयार केले आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर देशात भाजप सरकारविरोधात मोठा रोष व्यक्त झाला होता.